कल्याणच्या उच्चभ्रू वसाहतींमध्येही पाण्याचा ठणठणाट, रहिवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:23 AM2019-05-13T00:23:48+5:302019-05-13T00:23:58+5:30
येथील पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त आहेत.
कल्याण : येथील पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त आहेत. पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने, काही संकुलांमध्ये बोअरवेलच्या पाण्याचा आधार घेतला जात आहे. पण त्या पाण्याच्या वापरलाही मर्यादा असल्याने पुरेसे पाणी रहिवाशांना मिळत नाही.
बारवी आणि आंध्र धरणांतील झपाट्याने कमी होत असलेला पाणीसाठा पाहता, लघुपाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्राधिकरणांना एका आठवड्यात ३० तास पाणीकपातीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच १ जानेवारीपासून महिन्याच्या चौथ्या शनिवारीसुध्दा पाणी बंद ठेवले जात आहे. धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन १५ जुलैपर्यंत करण्यासाठी कल्याण डोंबिवलीत आधीपासूनच २२ टक्के पाणीकपात लागू केली होती. तेव्हा मंगळवारी पाणी पुरवठा बंद असायचा; परंतू नव्याने जारी केलेल्या आदेशानुसार ही कपात सहा तासांनी वाढविण्यात आल्याने आता चौथ्या शनिवारीही पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे.
दरम्यान, कपातीसाठी मंगळवार आणि महिन्यातील चौथा शनिवार पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतरही त्याच्या दुसऱ्या दिवशी पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. त्यात पाणी येण्याची वेळ ठराविक नसल्याने पाणी कधी येते आणि जाते याचाही थांगपत्ता लागत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कल्याण पश्चिमेकडील छोट्या चाळी आणि इमारतींबरोबरच मोठमोठया गृहसंकुलांनाही पाणीटंचाईची झळ बसत आहे. न्यू कल्याण तसेच उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असलेल्या खडकपाड्यामध्ये ७० ते ८० गृहसंकुले आहेत. यातील काही गृहसंकुलांना गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणी येत आहे. साधारण ७० टक्के रहिवाशांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. प्रामुख्याने आर. जे. कॉम्प्लेक्स, स्प्रिंग, ब्रम्हांड या गृहसंकुलांसह आजुबाजुच्या परिसरात ही समस्या जाणवत आहे. प्रारंभी ५ ते ६ तास मुबलक पाणी मिळायचे; परंतू आता केवळ दोन तासच पाणी उपलब्ध होत आहे.
आर. जे. कॉम्प्लेक्स, स्प्रिंग, ब्रम्हांड या गृहसंकुलांमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याने तळमजल्यावरील पाण्याच्या टाक्या अर्ध्याच भरतात. ते पाणी घराघरात पोहोचताना अत्यल्प प्रमाणात मिळते. मंगळवार आणि चौथा शनिवार पाणी पुरवठा पूर्ण दिवस बंद ठेवल्यानंतरही अन्य दिवशी कमी दाबाने पाणी मिळते, हे योग्य नाही, अशा भावना रहिवाशांच्या आहेत. दरम्यान, काही संकुलांतील रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक अर्जुन भोईर यांची भेट घेऊन पाणी टंचाईच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
काही गृहसंकुलांना कमी दाबाने पाणी मिळते ही वस्तुस्थिती आहे. कपातीनंतरही पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही, अशाही तक्रारी आल्या आहेत. कपात वगळता अन्य दिवशी सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासंदर्भात नियोजनासाठी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत.
- अर्जुन भोईर, स्थानिक नगरसेवक खडकपाडा