डोंबिवलीच्या ग्रामीण भागात ठणठणाट, महापालिका प्रशासनावर रहिवाशांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:47 AM2017-10-27T03:47:18+5:302017-10-27T03:47:28+5:30

डोंबिवली : गावे महापालिकेत आणि पाणीपुरवठा मात्र एमआयडीसीकडून, अशा कात्रीत सापडलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील पाणीटंचाई संपण्याची चिन्हे नाहीत.

Resolve residents in Dombivli rural areas, municipal administration | डोंबिवलीच्या ग्रामीण भागात ठणठणाट, महापालिका प्रशासनावर रहिवाशांची टीका

डोंबिवलीच्या ग्रामीण भागात ठणठणाट, महापालिका प्रशासनावर रहिवाशांची टीका

Next

अनिकेत घमंडी 
डोंबिवली : गावे महापालिकेत आणि पाणीपुरवठा मात्र एमआयडीसीकडून, अशा कात्रीत सापडलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील पाणीटंचाई संपण्याची चिन्हे नाहीत. दररोज शेकडो टँकरने येथे पाणीपुरवठा केला जातो. यंदा तर ऐन दिवाळीत अभ्यंगस्नानासाठीही टँकर मागवाण्याची वेळ आली. पालिकेने पाण्याच्या जुन्या वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले आहे, पण त्यातही फारशी प्रगती नसल्याने उन्हाळ्यात परिस्थिती किती भीषण होईल, या कल्पनेने त्यांना घाम फुटला आहे.
ऐन दिवाळीत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पाण्याअभावी सणासुदीला नातेवाइकही येत नाहीत. आयुष्याची पुंजी गोळा करून या भागात घर घेतले खरे, पण ते घेतले नसते तर बरे झाले असते, अशा शब्दांत नांदिवली-पंचानंद येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.
मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्र्यांकडे, जिल्ह्यात पालकमंत्र्यांकडे केवळ बैठका होतात. लोकप्रतिनिधी येतात, पाहणी करतात. पण, आमचे नळ मात्र कोरडे ठणाणा. पाणी मिळणार अशा घोषणा ऐकायच्या. पण, सोसायट्यांच्या टाक्यांमध्य २०० लीटरही पाणी येत नाही. किती वर्षे आम्ही पाण्यावाचून राहायचे आणि का, असा प्रश्न रहिवाशांनी केला.
महापालिकेचे ८० टँकर केवळ भोपर, नांदिवली पंचानंद भागात येतात. यावरून अन्य २५ गावांमधील पाण्याची अवस्था किती भयंकर आहे, याचा अंदाज येतो. महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणची पाहणी का करत नाहीत. पाण्याची कोणती लाइन सुरू आहे तसेच चढउतारामुळे पाण्याचा होणारा असमान पुरवठा, याबाबत काहीच पाहिले जात नाही. पाण्याच्या कुठेही व कशाही जोडण्या दिल्या जात असल्याने समस्या तीव्र आहे, असे रहिवाशांनी सांगितले.
>नांदिवली-पंचानंदमधील टंचाईग्रस्त इमारती आणि चाळी
बाप्पा मोर्या, लहूस्मृती चाळ, बामनदेव कृपा चाळ, ताई निवास, गणराज पार्क, पद्मिनी प्लाझा, पुंडलिक म्हात्रे अपार्टमेंट, शांताराम दर्शन, ताज पॅलेस, शांती सदन, समर्थ मराठा, जय मल्हार, कृष्णा दर्शन, बामनदेव कृपा, कृष्णगंगा, गुलमोहर, नवश्री संकल्प, महालक्ष्मी छाया, गावदेवी, काळुबाई निवास, मे फ्लॉवर, गणराज पार्क, सुरेश अपार्टमेंट, नामदेवी लीला, कृष्ण दर्शन, सीताराम निवास, कृष्ण गंगा सोसायटी, श्लोक अपार्टमेंट, टष्ट्वीन व्हीला.
मंत्रालयातील बैठकीत ठरल्याप्रमाणे एमआयडीसीने दोन आठ इंच व्यासाचे कनेक्शन देण्याचे ठरले. त्याची पूर्तता एमआयडीसीने केली. त्यास दोन महिने झाले, पण अद्यापही महापालिकेने ते कनेक्शन नवीन लाइन टाकून काही अंतरावरील जुन्या लाइनमध्ये बुस्ट करायचे होते, पण ते केलेले नाही. आयुक्तांना २३ आॅक्टोबरला पत्र दिले आहे, पण त्याचे अद्याप काहीही उत्तर नाही.
- प्रकाश म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य
आमच्या सोसायटीत ४४ सदस्य आहेत. एक टँकर दोन दिवस कसा पुरणार. जेमतेम ५ ते ६ बादल्या भरतात. कसे व्हायचे. नगरसेविकेला तरी किती आणि काय सांगणार? पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
- रोहिणी भोईर,
मे फ्लॉवर सोसायटी
दोन दिवसाआड टँकर येतो. त्यासाठी १०० रुपये मोजावे लागतात. पण, नऊ जणांना ते पाणी अजिबात पुरत नाही. आणखी किती काळ हे सहन करावे लागणार, कुणास ठाऊक?
- पुष्पा चौधरी,
समर्थ मराठा सोसायटी
एक वर्ष झाले. घरच्या सोडाच पण इमारतीच्या टाकीतील पाण्याच्या नळाला थेंब नाही. आमच्या इमारतीतील २६ सदनिकाधारकांना पिण्याचे पाणी पुरवताना नाकीनऊ येते.
- सुशीला नील, कृष्णगंगा सोसायटी
चार वर्षांपासून पाणीसमस्या भेडसावत आहे. आता तर अजिबात पाणी मिळत नाही. किती अर्ज करायचे आणि काय करायचे?
- किरण जाधव, श्लोक अपार्टमेंट
टँकरशिवाय पर्यायच नाही. एक दिवसाआड प्रकाश म्हात्रे यांना फोन करायचा, टँकर मागवून घ्यायचा, हे सुरूच आहे.
- नीता पाटील, गणराज पार्क

Web Title: Resolve residents in Dombivli rural areas, municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.