सरकारी जमिनीवर भूमाफियांनी बांधले रिसॉर्ट, बंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:34+5:302021-07-02T04:27:34+5:30

मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या सरकारी जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. या जमिनींवर माफियांनी बेकायदा ...

Resorts, bungalows built by land mafia on government land | सरकारी जमिनीवर भूमाफियांनी बांधले रिसॉर्ट, बंगले

सरकारी जमिनीवर भूमाफियांनी बांधले रिसॉर्ट, बंगले

googlenewsNext

मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या सरकारी जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. या जमिनींवर माफियांनी बेकायदा रिसॉर्ट, हॉटेल व बंगले बांधले आहेत. कित्येक एकर जमीन या भूमाफियांनी बळकावून ठेवलेली आहे. परंतु या गंभीर प्रकरणी स्थानिक नगरसेवक - राजकारणी यांच्यासह महापालिका, महसूल प्रशासन मात्र मूग गिळून आहे.

भाईंदरच्या पश्चिम परिसरात समुद्रकिनारी डोंगराच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य अशा डोंगरी चौक परिसरात शेकडो एकर सरकारी जमीन आहे. या जमिनीवर धनदांडग्या भूमाफियांची वक्रदृष्टी पडलेली आहे. या बेकायदा बांधकामांना महापालिका व महसूल विभागाने सातत्याने संरक्षण दिले आहे. सरकारी जमिनीवर बेकायदा रिसॉर्ट - हॉटेल बांधून सर्रास व्यवसाय केला जात आहे. काहींनी तर कित्येक एकर सरकारी जमीन बळकावून ठेवलेली आहे. पालिका या बेकायदा बांधकामांना नळजोडणी, दिवाबत्ती, रस्ते आधी सोयीसुविधा करून देते. सरकारी जमीन असूनही वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या सरकारला न जुमानता बेकायदा वीज पुरवतात.

जमिनी विक्री व भाड्याने देण्यासह त्याचा व्यावसायिक वापरही सुरू आहे. काहींनी तर अतिक्रमण नोंदवहीत बोगस नोंदी करून जमिनी बळकावल्या आहेत. तर सरकारी जमीन असूनही काही जणांनी न्यायालयात धाव घेऊन कारवाई टाळण्याचा खेळ चालवला आहे. नुकतीच उत्तन येथील सर्व्हे क्रमांक ३५० या १५ हेक्टर सरकारी जागेची पाहणी करण्यासाठी पोलीस व उत्तन तलाठी श्रुती मसुरकर गेले होते. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयास विविध उपक्रम, प्रशिक्षण, सरावासाठी जागेची आवश्यकता असल्याने या जमिनीची पाहणी करण्यात आली. या वेळी सरकारी जमिनीवर नवीन रिसॉर्टचे बांधकाम सुरू होते. तर अन्य काही बेकायदा रिसॉर्ट, हॉटेल, बंगले बांधल्याचे उघड झाले. याशिवाय बंगले व सरकारी जमिनी अडवून बागायती केल्याचेही दिसून आले.

-----------------------------------------------------------------------

तहसीलदारांकडून कारवाईचे आदेश

या प्रकरणी तलाठी यांनी संबंधितांना जागेच्या मालकीबाबतचे कागदोपत्री पुरावे सादर करण्यास बजावले आहे. तसेच तेथे सुरू असलेले नवीन बांधकाम तलाठी यांनी बंद करायला लावले. सरकारी जागेतील या बेकायदा रिसॉर्ट, हॉटेल, बंगले आदी बांधकामांची तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेत मंडळ अधिकारी प्रशांत कापडे व तलाठी मसुरकर यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. महापालिका उपायुक्त अजित मुठे यांनीही महापालिकेकडून स्थळपाहणी करून कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

Web Title: Resorts, bungalows built by land mafia on government land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.