मतदारनोंदणी मोहिमेला १२ हजारांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:19 AM2017-08-02T02:19:17+5:302017-08-02T02:19:17+5:30
महाविद्यालयांच्या माध्यमातून सुरू असलेल्या नवीन मतदारनोंदणी मोहिमेला गेल्या महिनाभरात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून याबाबतचा आढावा गुरुवारी सायंकाळी
ठाणे : महाविद्यालयांच्या माध्यमातून सुरू असलेल्या नवीन मतदारनोंदणी मोहिमेला गेल्या महिनाभरात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून याबाबतचा आढावा गुरुवारी सायंकाळी गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात घेण्यात आला. या वेळी बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदारनोंदणीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध गायक अनिरु द्ध जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होेता. भारतासारख्या लोकशाही देशात मतदानाची टक्केवारी कमी असते. लोकशाही प्रक्रियेद्वारे लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचे काम मतदार करतात. त्यामुळे पात्र व्यक्तींनी मतदारयादीत नाव नोंदवून मतदान केलेच पाहिजे, असे मत आयुक्त पाटील यांनी व्यक्त केले. महिनाभर सुरू असलेल्या या मोहिमेत सुमारे दीड लाख फॉर्मचे वाटप झाले असून १० ते १२ हजार मतदारांची नावनोंदणी झाली आहे. हा आकडा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाविद्यालयांत कॅम्पस अॅम्बॅसेडर नेमल्याने विद्यार्थी नावनोंदणीचा उपक्र म यशस्वी ठरत आहे, असे कल्याणकर म्हणाले. गायक अनिरुद्ध याने आपण नागपूरहून मुंबईला स्थायिक झालो, तेव्हा प्रथम मतदारयादीत नाव नोंदवून ओळखपत्र बनवून घेतल्याचे सांगितले. मतदारनोंदणी मोहिमेंतर्गत कार्य करणारे बांदोडकर महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश माळी यावेळी उपस्थित होते.