एसटीच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:29 AM2019-06-14T00:29:47+5:302019-06-14T00:29:55+5:30
उलगडला एसटीचा प्रवास : शुक्रवारी कल्याणला मुक्काम
ठाणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त सुरू झालेल्या ‘वारी लालपरीची’ या फिरत्या चित्रप्रदर्शनाची खास बस बोरीवली, वसई आणि पालघर या एसटी स्थानकापाठोपाठ गुरुवारी ठाण्यात दाखल झाली. गुरुवारी सकाळी ठाणे एसटी स्थानकात होर्डिंग्ज कोसळल्याने प्रदर्शनाची बस प्रदर्शनीभागापासून हलवली तरी एसटीच्या बसमध्ये ‘बस आॅफ अस फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेने मांडले प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
हे प्रदर्शन रा.प.महामंडळाच्या बसमध्ये मोहकपणे मांडण्यात आलेले आहे. एसटीचा पाच वर्षांतील आमूलाग्र बदल हा प्रवाशी वर्गाला कळावा व त्यांना प्रवाशी सेवेचे अंतरंग उलगडून दाखवावेत या उद्देशाने प्रवाशांना व सामान्य नागरिकांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोफत ठेवले आहे. ज्या बसस्थानकात हे प्रदर्शन असेल त्या परिसरातील शाळा -महाविद्यालये यांच्या प्राचार्य व विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. ते एसटीप्रेमी असलेल्या बस आॅफ अस फाउंडेशनच्या १२ जणांच्या चमूने तयार केले आहे. या चमूतील १२ ही जणांमधील एकाच्याही कुटूंबियांपैकी कोणीही एसटी विभागात काम नाही हेच विशेष आहे. या प्रदर्शनात कोणत्याही निषेध मोर्चामध्ये एसटी बस फोडणे,पेटवून देणे याने काय सिद्ध होते? एसटी महामंडळ ही आपली संस्था असून तिच्या मालमत्तेचे होणारे नुकसान म्हणजे आपले नुकसान असे म्हणत माझी काय चूक होती? तुमच्या वादामध्ये मला का शिक्षा? असे मजकुरही लावण्यात आला आहे. हे चित्र प्रदर्शन निवडणुकीनंतर काही दिवसांनीच अल्प कालावधी उभे केले आहे. ही बस शुक्रवारी कल्याण रेल्वे स्थानकात दाखल होईल. येत्या काही दिवसांत धावणाऱ्या खास स्टील बॉडी असलेल्या बसमध्ये ते मांडण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे रोहित धेंडे यांनी दिली.