दहशतवाद संपविणे इस्लामची जबाबदारी
By Admin | Published: March 7, 2016 02:17 AM2016-03-07T02:17:32+5:302016-03-07T02:17:32+5:30
इस्लामसंदर्भात पाश्चिमात्य देशातील प्रसार माध्यमे चुकीचा प्रचार करत आहेत. ते इस्लाम हा दहशतवाद्यांचा धर्म असल्याचा चुकीचा प्रचार करत आहेत.
भिवंडी : इस्लामसंदर्भात पाश्चिमात्य देशातील प्रसार माध्यमे चुकीचा प्रचार करत आहेत. ते इस्लाम हा दहशतवाद्यांचा धर्म असल्याचा चुकीचा प्रचार करत आहेत. ते चुकीचे आहे हे सांगण्यासाठी भिवंडीत मुस्लिम युनिटी फाऊंडेशनतर्फे ‘दहशतवाद विरोधी संमेलन’ झाले. दहशवाद संपवणे ही इस्लामची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मौलाना मोहम्मद युसुफ रजा कादरी यांनी केले.
मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये शुक्रवारी हे संमेलन झाले. इस्लाम धर्माची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या काही जणांकडून बदनामी केली जात आहे अशी टीका त्यांनी केली. इस्लाम धर्माचा अभ्यास केल्यास हा शांतीचा मार्ग दाखविणारा धर्म आहे, अशी भावना निर्माण होईल असे कादरी म्हणाले.
आंध्र प्रदेशमधील भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यासारख्या लोकांनी इस्लामचा अभ्यास करून त्याबाबत आपले विचार मांडले पाहिजेत. त्यांनी अभ्यास केल्यास ते इस्लामचे हितचिंतक बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शांती आणि मानवतेचा सन्मान करणे हा इस्लामचा नियम आहे तो अन्य धर्मात नाही.
इस्लाम सन्मान करण्यास शिकवितो व अत्याचाराची भावना नष्ट करतो. सध्या आयसीस आपल्या आंदोलनाव्दारे अरब देशातील मुसलमानांचा रक्तपात करीत आहेत. त्यांचा अंत करण्याची जबाबदारी इस्लामची आहे’ असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी उपस्थितांनी दहशतवादी संघटनांचा निषेध केला.
रझा अकादमीचे संस्थापक अल्हाज सईद नुरी आणि गुजरातचे मौलाना याकूब सिद्दीकी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.
मौलाना मकसूद आलम रिझवी, मौलाना शमशाद नुरी, मौलाना गुलाम मुस्तफा, मौलाना शमशेर आलम रिझवी, रझा अकादमीचे भिवंडीचे महासचिव मोहम्मद शकील रजा, हाजी अमान अमीन, हाजी सुलेमान यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)