एमजेपीवर २२७ कोटी रुपये खर्चाच्या शहापूर पाणीपुरवठा प्रकल्पाची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 01:15 AM2019-09-29T01:15:19+5:302019-09-29T01:17:05+5:30
जीवघेण्या पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी इगतपुरीजवळील भावली धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : जीवघेण्या पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी इगतपुरीजवळील भावली धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेवर २२७ कोटी ३८ लाख रूपये खर्च होणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्ण कामाची जबाबदारी ठाणे जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर (एमजेपी) नुकतीच सोपवली आहे.
उन्हाळ्यात शहापूर तालुक्यातील गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड देतात. या तालुक्यात मुंबई महापालिकेसह अन्यही शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, त्यातील पाणी या तालुक्यातील गावखेड्यांना मिळत नाही. यामुळे शहापूर हा आदिवासी तालुका तीव्र पाणीसमस्येच्या चक्र व्युहात सापडलेला आहे. यावर मात करण्यासाठी इगतपुरी तालुक्यामधील डोंगरपरिसरात असलेल्या भावली धरणातील पाणी शहापूरच्या ९७ गावांसह २५९ पाड्यांना पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. डोंगर उतारावरून येणारे हे पाणी शहापूरच्या या गावखे्यांना पुरवण्यात येणार आहे. गुरूत्वाकर्षणावर आधारीत या प्रादेशिक नळपाणीपुरवठ्यावर तब्बल २२७ कोटी ३८ लाख रुपये खर्च होणार आहे. या प्रकल्पाचे पूर्ण काम एमजेपीव्दारे करण्याच्या ठरावाला ठाणे जिल्हा परिषदेने नुकतीच मंजुरी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरीच्या डोंगर पठारावर भावली धरण आहे. या धरणातील पाणी पठाराखाली असलेल्या शहापूर तालुक्यामधील गावपाड्यांना पुरवता येणार आहे.
प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू
‘ग्रीड’ पद्धतीवर आधारीत हा प्रकल्प एमजेपीने युद्धपातळीवर सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने संमती दिली आहे. एमजेपीकडून या कामास विलंब होणार नाही, अल्पावधीतच या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासह त्याचा लाभ शहापूरच्या या टंचाईग्रस्त गावखेड्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे.