भोपाळमधील मूकबधिर मुलाची मुंबईत पालकांशी पुनर्भेट
By admin | Published: July 4, 2017 06:43 AM2017-07-04T06:43:23+5:302017-07-04T06:43:23+5:30
शाळा सुरू होण्यास अवघे दोनतीन दिवस शिल्लक असताना भोपाळमधील एका तेरावर्षीय मूकबधिर मुलाच्या ट्रकचालक वडिलांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शाळा सुरू होण्यास अवघे दोनतीन दिवस शिल्लक असताना भोपाळमधील एका तेरावर्षीय मूकबधिर मुलाच्या ट्रकचालक वडिलांनी अहमदनगरच्या श्रीरामपूर येथील शाळेजवळ राहणाऱ्या मावशीकडे त्याला सोडले. वडील जाताच, त्याने मावशीचा डोळा चुकवून रेल्वेस्थानक गाठले. मात्र,तो भोपाळला जाण्याऐवजी थेट मुंबईत आला. मात्र, मूकबधिर आणि नवे शहर असल्याने त्याच्यासमोर अडचणीचे डोंगर उभे होते. त्याचवेळी योगायोगाने मुंबईतील डोंगरी बालसुधारगृहात गेलेल्या ठाणे पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमुळे त्या मुलाची आणि त्याच्या आईवडिलांची १० दिवसांनी पुनर्भेट घडून आली.
अलंकार (नाव बदलले) हा आईवडील आणि दोन लहान भावांसह भोपाळात वास्तव्यास होता. तो मूकबधिर असल्याने त्याला मुलांच्या श्रीरामपूर येथील शाळेत भरती केले होते. ५-६ वर्षांपासून तो त्याच शाळेत राहत होता. शाळेला मे महिन्याची सुटी लागल्याने त्याचे वडील त्याला भोपाळला घेऊन आले होते. तर, जूनमध्ये त्याची शाळा सुरू होणार होती. याचदरम्यान, त्याच्या वडिलांना ट्रक घेऊन बाहेरगावी जावे लागणार असल्याने त्यांनी अलंकारला श्रीरामपूर येथील पुणतांबा गावी राहणाऱ्या मावशीकडे १४ जून रोजी सोडून ते पुढे गेले. सुटीच्या दिवसांत त्याला आईचा जास्तच लळा लागला होता. वडील गेल्यावर त्याने मावशीचा डोळा चुकवून पुन्हा भोपाळला जाण्यासाठी रेल्वे स्थानक गाठले. पण, एका एक्स्प्रेसने तो त्याचदिवशी मुंबईत दाखल झाला. दुसऱ्याच दिवशी त्याच्या कुटुंबीयांनी तो हरवल्याची तक्रार अहमदनगर येथील राहता पोलीस ठाण्यात दाखल केली.तसेच तो मिळाल्यावर बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. तो मूकबधिर असल्याने त्याला ऐकू आणि बोलणे शक्य नसल्याने त्याच्या पुढे अडचणीचे डोंगर उभे राहिले होते. दरम्यान, त्याला एका संस्थेने डोंगरी बालसुधारगृहात दाखल केले. त्याचवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.व्ही.अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाय.एस.सोनावणे, पोलीस नाईक प्रमोद पालांडे, भाऊसाहेब शिंगारे आणि पोलीस हवालदार नथुराम चव्हाण हे पथक डोंगरीत गेले असताना, अलंकार त्यांच्या निदर्शनास आला. मूकबधिर असल्याने पोलिसांनी त्याच्याशी त्या पद्धतीने विचारणा केली. पण, तो प्रतिसाद देत नसल्याने त्याला एक पेन आणि कागद दिले. त्यावर त्याने आपले नाव आणि श्रीरामपूर असे तुटक अक्षर रेखाटले.
मुलगा परतला स्वगृही
त्याच्या कुटंबीयांचा शोध सुरू झाला आणि त्याची ओळख पुढे आली. ठाणे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे,सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली २४ जूनला त्याला डोंगरी बालकल्याण समितीसमोर उभे के ल्यानंतर त्यांची भेट घडून आली.