निर्बंध शिथिल, पण केडीएमटीच्या बहुतांश बस आगारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:43 AM2021-08-27T04:43:30+5:302021-08-27T04:43:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वसामान्य नागरिकांसाठी बस आगाराबाहेर निघालेल्या नाहीत. गेली दीड वर्षे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वसामान्य नागरिकांसाठी बस आगाराबाहेर निघालेल्या नाहीत. गेली दीड वर्षे कल्याण -डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम आधीच तोट्यात असताना सध्या निर्बंध शिथिल केल्यानंतरही बस संचालनाअभावी आगारातच खितपत पडल्या आहेत. त्यामुळे बसअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत उपक्रमाचे १४० कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. यात रेल्वे स्थानकांवर पास पडताळणीसाठी जुंपलेल्या ४० वाहकांचा समावेश आहे.
उत्पन्न आणि खर्च याच्यातील वाढत्या तफावतीमुळे परिवहन उपक्रम तोट्यात आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी साडेपाच लाखांपर्यंत मिळणारे दैनंदिन उत्पन्न आज दीड लाखांच्या आसपास आहे. लॉकडाऊनचा फटका उपक्रमाला बसल्याचे बोलले जात असले तरी सध्या कोरोनाचे निर्बंध शिथिल होऊनही उत्पन्न वाढीसाठी जादा बस आगाराबाहेर काढलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
सध्या सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. नागरिकांचा वावरही सर्वत्र वाढला आहे. त्यामुळे आगारात खितपत पडलेल्या उपक्रमाच्या बस बाहेर काढून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होणे आवश्यक होते. परंतु, तसे काहीही होताना दिसत नाही. उपक्रमात १४१ बस सुस्थितीत आहेत. सध्या यातील केवळ ५० बस रस्त्यावर धावत आहेत. त्याचा फायदा अन्य सार्वजनिक व खासगी वाहतुकीने घेतला असून प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू आहे. रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस बंधनकारक केले आहे. परंतु, केडीएमसी हद्दीचा आढावा घेता लसीकरणाचा खेळखंडोबा सातत्याने सुरू आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक दोन लसींअभावी रस्ते वाहतुकीचा आधार घेत आहेत. अशावेळी केडीएमटीने जादा बस आगाराबाहेर काढून प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे आहे.
मात्र, उपक्रमाचे १४० कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी अन्य खात्यांमध्ये वर्ग केले आहेत. यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना विशेष बस, रुग्णवाहिका यावर चालक आणि वाहक कार्यरत असताना परिवहन कर्मचाऱ्यांना मास्क कारवाईचेही काम देण्यात आले आहे. तर आता रेल्वे स्थानकांवर लसीचा दोन डोस पूर्ण करणाऱ्यांना पास मिळण्यासाठी केल्या जात असलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ४० वाहक देण्यात आले आहेत. यात अजून वाढ होण्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाहकांची नेमणूक तात्पुरती
कोरोनामुळे जादा बस रस्त्यावर काढल्या जात नाहीत. त्यामुळे वाहकांना रेल्वे पाससाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी नेमण्यात आले आहे. ही नेमणूक तात्पुरत्या स्वरूपासाठी करण्यात आली आहे. ज्यावेळी बस अधिक प्रमाणात काढल्या जातील तेव्हा पुन्हा चालकांना आणि वाहकांना पुन्हा उपक्रमाची जबाबदारी दिली जाईल.
- बाळासाहेब चव्हाण, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, केडीएमसी
-------------------------------------------