सध्या लागू केलेले निर्बंधही अयोग्य, बदल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:41 AM2021-03-31T04:41:07+5:302021-03-31T04:41:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत, तर याचेही उल्लंघन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत, तर याचेही उल्लंघन केल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा लॉकडाऊन हा उपाय नाही, असे म्हणत राज्यातील ११० संघटनांच्या जनआंदोलनाच्या संघर्ष समितीने लॉकडाऊनला एक प्रकारे विरोधच केला आहे, तसेच सध्या लागू केलेले निर्बंध अयोग्य असून, त्यात बदल करावेत, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रदीर्घ लॉकडाऊन जाहीर केला होता. या लॉकडाऊनने अर्थचक्र थांबल्याने जनतेचे जे हाल झाले, त्यातून अनेक जण अद्याप उभे राहिलेले नाहीत. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, लॉकडाऊनविषयी चर्चा होत आहेत. परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिलेत, तर सध्या काही निर्बंध घातले आहेत. मात्र, ते निर्बंधही सामान्यांसाठी त्रासदायक आहेत. त्यात तातडीने सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत संघर्ष समितीने व्यक्त केले आहे. नाइट कर्फ्यूमुळे दुकाने रात्री ८ वाजताच बंद होत असल्याने सायंकाळी दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडते. दुकानांना आणखी थोडी मुभा द्यावी. चाकरमान्यांची रखडपट्टी होऊ नये यासाठी रिक्षा रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात. सर्व वयोगटांतील लोकांना सरसकट लस उपलब्ध करून द्यावी. कष्टकरी जनतेचा रोजगार बुडेल, असे कोणतेही निर्बंध घालू नयेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व रुग्णांवर इलाज करावेत आदी मागण्या संघर्ष समितीचे निमंत्रक संजीव साने, विश्वास उटगी, एम.ए. पाटील, उल्का महाजन, डॉ. एस.के. रेगे आदींनी मुख्यमंत्र्याकडे केल्या आहेत.