कोरोना रोखण्यासाठी ठाण्यात सोसायट्यांवर बंधने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:20 AM2021-02-28T05:20:52+5:302021-02-28T05:20:52+5:30
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात नव्याने कोरोनारुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने पोलिसांमार्फत कारवाईस ...
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात नव्याने कोरोनारुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने पोलिसांमार्फत कारवाईस सुरुवात केली आहे. शहरातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या प्रत्यक्ष रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे पालिकेने आता विविध उपाय योजून शहरातील सोसायट्यांवरदेखील बंधने लादून सूचना केल्या आहेत. तसेच ज्या झोपडपट्टीत रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणी तापाच्या रुग्णांची पुन्हा पाहणी सुरू केली आहे. शहरात रुग्ण दुपटीचा कालावधी ३२३ दिवसांवरून २९७ दिवसांवर आला आहे.
मागील वर्षी ऑक्टोबरपासून कोरोनारुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने महापालिकेने टप्प्याटप्प्याने वागळे, कळवा, मुंब्रा येथील कोविड सेंटर बंद केले. तर भाईंदरपाडातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तयार केलेले सेंटरही बंद केले होते. परंतु, आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी कोरोनारुग्णांची संख्या वाढली. नागरिकांकडून नियमांचे होणारे उल्लंघन, मास्क न वापरणे, गर्दी करणे यामुळेदेखील ती वाढताना दिसू लागली आहे. त्यामुळे पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळेच आता महापालिकेने झोपडपट्टी भागात पुन्हा तापाच्या रुग्णांची पाहणी सुरू केली आहे.
कोरोनाचे रुग्ण पुन्हा जास्त प्रमाणात आढळणाऱ्या भागात विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसेच सोसायट्यांनादेखील महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नवीन कोणीही सोसायटीत येऊ नये, सोसायटीच्या टेरेसवर गर्दी होणार नाही यासाठी काळजी घेणे, एखाद्या सोसायटीमध्ये जास्तीचे रुग्ण आढळल्यास ती सोसायटी सील केली जाणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येणार आहे; शिवाय अत्यावश्यक काम असेल तरच इतरांनी सोसायटी बाहेर जावे, असेही नमूद केले आहे.