ठाण्यात आणखी महिनाभर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:25 AM2020-06-01T00:25:09+5:302020-06-01T00:25:23+5:30

ठाणे महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय : २३९ कंटेनमेंट झोनमध्ये रहिवाशांवर बंधने कायम

Restrictions in Thane for another month | ठाण्यात आणखी महिनाभर निर्बंध

ठाण्यात आणखी महिनाभर निर्बंध

Next

जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये तब्बल २३९ कंटेनमेंट झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाले आहेत. या सर्वच झोनमध्ये किमान ३0 जूनपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. केंद्रापेक्षा राज्य शासनाच्या धोरणांप्रमाणे कंटेनमेंट झोन आणि त्याबाहेरील परिसरात नियमावली राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार पहिल्याच टप्प्यामध्ये ८ जूननंतर धार्मिक स्थळे, हॉटेल आणि मॉल्स खुली केली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा विचार आहे. परंतु, ३0 जूनपर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहणार असल्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्य-सावरकरनगर, नौपाडा-कोपरी, उथळसर, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा या सर्वच म्हणजे नऊ प्रभाग क्षेत्रांमध्ये लॉकडाउनची स्थिती राहणार आहे. एकट्या लोकमान्यनगर भागात ३0 मेपर्यंत कोरोनाचे ७७१ रुग्ण आढळले असून, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ वागळे ४३२ (१५), मुंब्रा ३७१ (१२), नौपाडा ३६५ (९) असे एकूण दोन हजार ९0१ बाधित असून ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक हजार ५८0 जणांवर उपचार सुरू असून १२३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या तरी एखाद्या भागात रुग्ण आढळल्यानंतर संबंधित इमारत सील केली जाते. झोपडपट्टी भागात काही परिसर जाण्यायेण्यासाठी प्रतिबंधित केला जातो. त्याठिकाणी महापालिका तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने अत्यावश्यक सुविधा पुरविल्या जात आहेत.
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या भागात रुग्ण किंवा संशयित आढळल्यानंतर तो कंटेनमेंट झोन घोषित केला जातो. याचा रोज आढावा घेतला जातो. शेवटचा रुग्ण निगेटिव्ह येईपर्यंत तो परिसर कंटेनमेंट झोन राहणार असून यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे ही नियमावली असल्यामुळे यात कोणी आक्षेप घेण्याचाही प्रश्न उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

असे आहेत ठाण्यातील कंटेनमेंट झोन...
सध्या मुंब्रा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक म्हणजे ४२ कंटेनमेंट झोन आहेत. यामध्ये कौसा, एमएम व्हॅली परिसर, सरकार टॉवर, अमृतनगर, पारसिक बोगदा आदींचा समावेश आहे. नौपाड्यात ३५ झोन असून यात महागिरी नवीन पोलीस टॉवर, नीळकंठ दर्शन सोसायटी, साठेवाडी, रहेजा गार्डन आणि दादोजी कोंडदेव परिसर आदी भाग आहे. लोकमान्यनगरमध्ये ३२ झोन असून यात सावरकरनगर, विजयनगर, लोकमान्यनगर पाडा क्रमांक एक ते तीन, रुपादेवीपाडा आणि इंदिरानगर आदी भाग येतो. याशिवाय, कळवा येथे आतकोनेश्वरनगर, भास्करनगर, विटावा, बुधाजीनगर आणि खारेगाव असे २८ तर उथळसरमध्ये राबोडी आणि पाचपाखाडीसह २१ झोन आहेत. माजिवडा-मानपाडा येथे डोंगरीपाडा, किंगकाँंगनगर, हिरानंदानी इस्टेट, हायलॅण्ड रेसिडेन्सी, पुराणिक होमटाउन आणि भार्इंदरपाडा असे २७ झोन आहेत. वागळे इस्टेटमध्ये कैलासनगर, सीपी तलाव आणि किसननगर एक ते तीन असे २४, वर्तकनगरमध्ये वसंतविहार, शिवाईनगर, तुळशीधाम असे १३ आणि दिवा येथे ओंकारनगर, दिवा पूर्व असे १७ कंटेनमेंट झोन आहेत.

एखाद्या भागात कोरोनाचा रु ग्ण मिळाल्यानंतर तो कंटेनमेंट झोन घोषित होतो. तिथे १४ दिवसांचा आढावा घेतला जातो. त्या काळात तिथे जर पुन्हा
रु ग्ण आढळला, तर तो कालावधी वाढविला जातो. सध्या राज्य शासनाच्या धोरणानुसार यात आणखी काही निर्णय होऊ शकतात.
- अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका

Web Title: Restrictions in Thane for another month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.