येऊरमध्ये पर्यटकांना प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:45+5:302021-07-04T04:26:45+5:30

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धबधबे आणि पर्यटन स्थळांवर बंदी असतानादेखील अनेक पर्यटक लपूनछपून शहराला लागून असलेल्या येऊर येथील धबधबे ...

Restrictions on tourists in Yeoor | येऊरमध्ये पर्यटकांना प्रतिबंध

येऊरमध्ये पर्यटकांना प्रतिबंध

Next

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धबधबे आणि पर्यटन स्थळांवर बंदी असतानादेखील अनेक पर्यटक लपूनछपून शहराला लागून असलेल्या येऊर येथील धबधबे आणि तलावामध्ये जाऊन पोहण्याचा व पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यास जात आहे. अशा अतिउत्साहीपणामुळे येथील तलावात बुडून पाचजणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. या घटनांनंतर वन विभाग आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे आता येऊर पर्यटनस्थळी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वन विभागाने दिला असून, तसेच फलकदेखील जागोजागी लावले आहेत.

ठाणे शहरात निसर्गाने नटलेल्या संजय गांधी येऊर या पर्यटन स्थळी पावसाळ्याच्या काळात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसह अतिउत्साही पर्यटकांचादेखील वावर वाढत असल्याचे दिसून येते. अशाच अतिउत्साही पर्यटकांच्या वावराला आवर घालण्यासाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये तीन वर्षांची शिक्षा आणि २५ हजारांच्या दंडाची तरतूद आहे, अशा आशयाचे फलक वनविभागाने येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात लावून, तसेच पहारा देऊन पर्यटकांना प्रवेशबंदी केली. पावसाळ्याच्या काळात अनेक हौशी पर्यटक रविवार सुट्टीचा दिवस निसर्गाच्या व धबधब्यांच्या सान्निध्यात घालविण्यासाठी व पार्ट्यांचे फड रंगविण्यासाठी येऊरचा रस्ता धरत असतात. यामुळे एक तर जंगल परिसरातील शांतत भंग होत असते, तर दुसरीकडे पर्यटकांकडून फेकण्यात येणाऱ्या जेवणाच्या डिश, पाण्याच्या बाटल्या फेकण्यात येत असल्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत असते. त्यात जंगलातील तलावात पोहण्याचा आनंददेखील लुटण्यासाठी जात असतात. असेच मागील दहा ते १५ दिवसांपूर्वी पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पाच मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर वन विभाग आणि पोलीस यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. याची गांभीर्याने दाखल घेऊन जंगलातील निषिद्ध क्षेत्रात वनविभागाने फलक लावले असून, खडा पहाराही देण्यात येत आहे. त्यामुळे येऊरच्या जंगलात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटकांचा वावर

वन्यजिवांचा वावर असलेल्या अरण्यात पर्यटकांना प्रतिबंध असतानाही सुरक्षेच्या अभाव असल्याने सध्या रोज हजारो पर्यटक जंगलात फिरत आहेत. याकडे वनविभाग, पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. या भागात वनविभागाने, तसेच पोलिसांनी गस्त घालावी आणि प्रतिबंधित क्षेत्रात जागोजागी फलक लावण्याची मागणी येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ येऊर संवर्धन व विकास समिती, तसेच संडे ट्रेकर्स संस्थेच्या वतीने ॲड. संतोष आग्रे यांनी केली आहे.

Web Title: Restrictions on tourists in Yeoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.