सर्व शाळांचा निकाल यंदा १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:36+5:302021-06-01T04:30:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क स्नेहा पावसकर ठाणे : दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आणि अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली ...

The result of all schools this year is 100 percent | सर्व शाळांचा निकाल यंदा १०० टक्के

सर्व शाळांचा निकाल यंदा १०० टक्के

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

स्नेहा पावसकर

ठाणे : दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आणि अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार, असा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे यंदा सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार असल्याने सर्व शाळांचा निकालही १०० टक्के लागणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. तर पालक मात्र निकालाची गुणवत्ता घसरणार या आणि प्रवेशात गोंधळ तर होणार नाही ना, याच चिंतेत आहेत.

ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले एकूण १०५७७८ विद्यार्थी असून सर्वाधिक विद्यार्थी ठाणे महानगरपालिका हद्दीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करून निकाल आणि गुणवत्तेबाबत धोरण शासनाने शुक्रवारी जाहीर केले. निकालाबाबत दहावीच्या परीक्षेसाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापनानुसार तर ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणानुसार देण्यात येणार आहे. तर अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे जाहीर केले असून ती ऐच्छिक ठेवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थी खुश आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना नववीत कमी गुण मिळाले होते त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. तर सीईटी तरी घेणार कशी, असा प्रश्न पालक आणि शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

---------

सरसकट पास करण्याचा निर्णय योग्य आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेऊन जर कोणाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर याची भीती वाटते आणि सीईटी पण ऐच्छिक ठेवली ते बरे झाले.

-रामेश्वरी सकट, विद्यार्थिनी

-----------

दहावी निकाल आणि अकरावी प्रवेशाचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला असला तरी अनेक मुले ९ वीपेक्षा दहावीत जास्त अभ्यास करतात. ज्यांना ९ वीत गुण कमी मिळाले होते अशांच्या गुणांवर परिणाम होऊ शकतो.

-रजनीश देवरुखे, विद्यार्थी

-----------

निर्णय योग्य वाटत असला तरी मुलांची पुढील शैक्षणिक वाटचाल पाहता फारसा आशादायी नाही. परीक्षा रद्द केल्यामुळे काही मुलांनी अभ्यासाकडे दुर्ल‌क्ष केले होते आणि चांगल्या कॉलेजमध्ये जायचे स्वप्न तर सगळ्यांचेच असते. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी सीईटी दिली तर प्रवेशप्रक्रियेतही चुरस होऊ शकते. एकूणच मुलांची मानसिकता या सगळ्यामुळे बिघडते.

-वैशिका लिमये, पालक

--------------

गेल्यावर्षीच्या गुणांचे निकालात मूल्यमापन करणे योग्य वाटत नाही. जर प्रवेशासाठी सीईटीही वेगळी घेतली जाणार असेल तर मग याच वर्षीच्या अंतर्गत मूल्यमापनानुसार निकाल लावला पाहिजे.

-दुर्वेश सांबरकर, पालक

--------------

शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतलेला असला तरी आता नेमकी सीईटी कशी घेणार, हा प्रश्न उरतोच. ऑफलाइन घेतली तरी पुन्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा येतोच आणि ऑनलाइन घेतली तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरेनट, मोबाइल, नेटवर्कची समस्या असते. त्यामुळे सीईटीची अंमलबजावणी कशी होते हे पाहावे लागेल, असे मत काही शिक्षकांनी व्यक्त केले.

-----------

शासनाचा निर्णय योग्यच आहे. यंदाची परिस्थिती पाहता जे गुण मिळतील त्यात समाधान मानून पुढचा अभ्यास केला पाहिजे. त्यावर कोणीही नाराज होण्याचे कारण नाही. तसेच ज्या शाळांची ज्युनिअर कॉलेजेस आहेत तेथील मुलांना पुढील वर्गात थेट प्रवेश दिला गेला पाहिजे. तर सीईटीसुद्धा फॅकल्टीनुसार घेता येईल, म्हणजे सगळ्यांचाच ताण कमी होईल, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

--------

ठाणे जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी - १०५७७८

ठाणे शहरातील दहावीचे विद्यार्थी - २५७८४

Web Title: The result of all schools this year is 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.