इमारतीला तडा गेल्याने ११ परिवारांतील ५० जणांना शाळेत हलवले, ठाणे महापालिकेची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 04:23 AM2020-07-18T04:23:58+5:302020-07-18T04:24:19+5:30
ठाणे शहरात गेल्या २४ तासांत ५६ मिमी पाऊस पडला. रात्रीच ही इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्या धोकादायक इमारतीचा काही भाग शुक्रवारी पाडायला घेतला आहे.
ठाणे : ठाणे शहरात गुरुवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असताना मध्यरात्री खोपट येथील गोकुळवाडीतील साई आनंद या चार मजली इमारतीला तडा गेल्यामुळे ती तत्काळ रिकामी करण्यात आली. ही इमारत केवळ २० वर्षांपूर्वी उभी केली होती. खबरदारीची उपाययोजना म्हणून या इमारतीतील आठ रूममधील रहिवासी, तर साळुंखे चाळीचे दोन आणि भोईर चाळीतील एक परिवार अशा ११ परिवारांतील तब्बल ५० जणांना जवळच्या महापालिकेच्या दोन शाळांमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच तळमजल्यावरील तीन दुकाने सील करण्यात आली आहेत, असे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.
ठाणे शहरात गेल्या २४ तासांत ५६ मिमी पाऊस पडला. रात्रीच ही इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्या धोकादायक इमारतीचा काही भाग शुक्रवारी पाडायला घेतला आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. या कालावधीत मुंब्रा कोळीवाडा येथील एक जुनी भिंत व घोडबंदर रोडवरील एक झाड धोकादायक स्थितीत आहे. साकेत रोडवरील महालक्ष्मी मंदिराजवळ व कौसा येथील अशी दोन झाडे उन्मळून पडली. जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेशन रोडवर व वागळे इस्टेट येथील झाडाच्या फांद्या तुटल्या. मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आजही चुकला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातूनही पाऊस गायब झाला आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये १०४ मिमी म्हणजे सरासरी १४.८९ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत पडला. यामध्ये सर्वाधिक ठाणे शहर परिसरात ५६ मिमी पाऊस झाला. या खालोखाल कल्याण १४ मिमी, अंबरनाथ ४ मिमी, उल्हासनगर ५ मिमी, भिवंडी १५ मिमी, शहापूर १० मिमी पाऊस पडला.
ठाणे जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसीला आणि नगर परिषदांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात पाऊस पडला नाही. या धरणात ४५ टक्के पाणीसाठा आहे.