मॉलमुळे पुस्तकविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:50 PM2019-06-20T23:50:43+5:302019-06-20T23:50:53+5:30
यंदा जेमतेम ३०-४० टक्के व्यवसाय
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर शालेय उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाते. परंतु, मॉलमध्ये या वस्तूंची खरेदी करण्याकडे अनेक ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर पाणी फिरले आहे. यंदा ३० ते ४० टक्केच व्यवसाय झाला आहे, अशी माहिती बुक सेलर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रेय माळी यांनी दिली आहे.
माळी म्हणाले, शाळांमधून शालेय उपयोगी साहित्य देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीनचार वर्षांपासून त्याचा फटका आमच्या व्यवसायाला बसतच होता. तसेच मॉलमध्ये वस्तूंच्या खरेदीवर २५ टक्क्यांची सूट देण्यात येत होती. त्यामुळे ग्राहकांचा कल हा मॉलमध्ये खरेदी करण्याकडे यंदा जास्त होता. छोट्या व्यावसायिकांचा यामुळे ३० ते ४० टक्के व्यवसाय कमी झाला.
बुक सेलर असोसिएशनमध्ये डोंबिवलीत २१६, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर येथील १४०, भिवंडीतील १० आणि दिव्यातील १५ विके्रते आहेत. या सर्व विक्रेत्यांना यंदा व्यवसाय कमी झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी शालेय वस्तूंची उलाढाल ही पाच कोटींची झाली होती. यंदाच्या वर्षी ती कमी होऊन पावणेतीन कोटींवर गेली आहे. आम्ही छोटे विक्रेते असलो, तरीही ग्राहकांना १० टक्के सूट देतो. पहिली ते नववीपर्यंतच्या शालेय वस्तूंच्या खरेदीला फटका बसल्याचे दिसून येत आहे. आता अकरावीची पुस्तके बाजारात येणे बाकी आहे. या पुस्तकांमुळे व्यवसायात थोडीफार भर पडेल, अशी आशा व्यावसायिकांना आहे. आमचा वर्कबुकचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे. वर्कबुकही शाळेतून दिली जातात. त्यामुळे त्यांचाही ९० टक्के व्यवसाय कमी झाला आहे. शाळांमधून शालेय साहित्य दिले जाते, पण त्यावर कोणतीही सूट दिली जात नाही. पण, पालकांना शाळेतून खरेदी करावे लागते. या सर्वांमुळे छोट्या व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे, असे ते पुढे म्हणाले.
शाळाही पुरवतात शालेय वस्तू
एका पुस्तकविक्रेत्याने सांगितले, यंदाच्या वर्षी आमचा व्यवसाय कमी झाला. सुरुवातीला ही समस्या एका पुस्तकविक्रेत्यापुरती मर्यादित असल्याचे वाटत होते. परंतु, संघटनेतील इतर विक्रेत्यांशी चर्चा केल्यानंतर व्यवसाय कमी होण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मॉलमधून वाढती खरेदी याबरोबरच शाळाही दरवर्षी विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे व्यवसायास फटका बसत आहे. परिणामी, यंदाच्या वर्षी शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी नेहमीसारखी गर्दी दुकानांमध्ये झाली नाही.