कमी पावसामुळे भात उत्पादनावर परिणाम
By Admin | Published: November 2, 2015 01:37 AM2015-11-02T01:37:39+5:302015-11-02T01:37:39+5:30
डहाणू तालुक्यात सध्या भातकापणी तसेच भात झोडणीचा हंगाम सुरु आहे. मात्र पावसाचे कमी प्रमाण व अनियमितता यामुळे भाताच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे
शशिकांत ठाकूर, कासा
डहाणू तालुक्यात सध्या भातकापणी तसेच भात झोडणीचा हंगाम सुरु आहे. मात्र पावसाचे कमी प्रमाण व अनियमितता यामुळे भाताच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यात मोठी घट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सरासरी ४०.६३ मीमी पाऊस कमी झाला आहे.
तालुक्यात यंदा सरासरी केवळ ६७.१ मि.मि. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. यामध्ये गरवी भातशेती ९,५०० हेक्टर तर हळवी भातशेती ५५०० हेक्टर क्षेत्रावर केली जाते. सूर्या कालव्याच्या पाण्यावर उन्हाळ्यात सुमारे ७५०० हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते.
तालुक्यात यंदा पाऊस वेळेवर सुरू झाला नाही आणि पाऊस सुरु झाल्यानंतरही त्यात नियमीतता नाही. त्यामुळेही भाता लागवडीवर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भातपेरणी झाल्यानंतर २१ दिवसाच्या कालावधीत रोप तयार होऊन लागवड होणे गरजेचे आहे. मात्र लागवडीसाठी पाऊसच वेळेवर सुरु न झाल्याने शेतकऱ्यांना महिनाभर भात रोपणासाठी वाट पहावी लागली.
लागवडीनंतरही पाऊस खूप कमी तसेच वेळेवर न झाल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे काही ठिकाणी उष्णतेमुळे पिके होरपळून गेली. तसेच कणीस बाहेर येण्याच्या कालावधीत तसेच रोपाला फुटवा येणाच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी पाऊसच झाला नाही. तर काही शेतकऱ्यांनी बाजारातून संकरीत जातीच्या वाणाची खरेदी केली असता ते बियाणे बनावट असल्याने दाणे उगवलेच नसल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. तसेच पावसा अभावी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे भात उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकरी जयेंद्र ठाकूर यांनी सांगितले.