दुसरी लाट ओसरु लागल्याने कोरोना रुग्णालयातील ६५ टक्के बेड रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:01+5:302021-06-28T04:27:01+5:30
मीरा रोड : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने सध्या रुग्णसंख्याही कमी होत आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेने त्यांची ३ उपचार ...
मीरा रोड : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने सध्या रुग्णसंख्याही कमी होत आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेने त्यांची ३ उपचार केंद्रे बंद केली असून २ रुग्णालये सध्या सुरू आहेत. या दोन्ही रुग्णालयांत मिळून ६५ टक्के इतके बेड रिकामे आहेत. मीरा-भाईंदर महापालिकेने कोरोना रुग्णांच्या मोफत उपचारासाठी भाईंदर पश्चिमेतील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे सुरुवातीलाच कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केले आहे. या रुग्णालयात २५० बेडची क्षमता आहे. सध्या ८० च्या आसपास रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
भाईंदर पूर्वेला इंद्रलोक परिसरात प्रमोद महाजन सभागृहात महापालिकेने कोविड रुग्णालय सुरू केले आहे. खासगी वैद्यकीय व्यवस्थापनामार्फत सुरू असलेल्या या रुग्णालयात २०० बेड असून सध्या येथे ७५ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. जोशी व महाजन या दोन्ही रुग्णालयांची मिळून ४५० बेडची संख्या असली तरी सध्या ६५ टक्के बेड रिक्त आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने महापालिकेने मीनाताई ठाकरे सभागृहात सुरू केलेले १६५ खाटांचे व धर्माधिकारी सभागृहात सुरू केलेले १९५ खाटांचे कोविड रुग्णालये तूर्तास बंद केली आहेत. याशिवाय न्यू गोल्डन नेस्ट येथील आर वन हे कोरोना अलगीकरण केंद्रही महापालिकेने बंद केले आहे.
-----------------------------------
तिसऱ्या लाटेसाठी पालिका सज्ज
बंद केलेल्या उपचार केंद्रांच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नेमलेले कर्मचारी तसेच नाश्ता - जेवण पुरवठ्याचे कंत्राटही कमी केलेले आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावरही ही कोविड उपचार केंद्र, अलगीकरण केंद्र बंद करण्यात आली होती. दुसऱ्या लाटेवेळी आवश्यकतेनुसार ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. आताही आवश्यकता नसल्याने ती पुन्हा बंद केली असून तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यकता भासल्यास ही कोविड उपचार केंद्रे सुरू करण्याची तयारीही पालिकेने ठेवलेली आहे.