निकाल लागला, मार्कशीट मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 12:51 AM2019-12-08T00:51:55+5:302019-12-08T00:52:00+5:30
बीए मराठीच्या विद्यार्थ्यांचा पेच; पुढील शिक्षण घेताना येताहेत अडचणी
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयातून एप्रिल-मे २०१९ मध्ये मराठी विषय घेऊन तृतीय वर्ष बीएच्या परीक्षेला बसलेल्या १३ पैकी तीन विद्यार्थ्यांना मार्कशीट देण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित १० जणांना ते अजूनही दिलेली नाहीत. मार्कशीट विद्यापीठाकडून आले नसल्याचे कारण वारंवार सांगितले जात असल्याने पालकांनी महाविद्यालयाकडे विचारणा करताच क्लार्कने आॅनलाइन निकालाची प्रत पाहून त्यावर रिझर्व्ह फॉर लोअर एक्झाम (आरईएल) असे लिहिले आहे. त्यामुळे निकाल विद्यापीठाने थांबून ठेवला आहे, असे सांगितले.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता प्रधान हिने ही परीक्षा दिली होती.
मात्र, निकाल लागून सहा महिने होऊनही तिला मार्कशीट दिलेले नाही. यामुळे माझ्या पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत आहे. याबाबत मुंबई विद्यापीठात पालकांनी चौकशी केली असता महाविद्यालयाने चौथ्या सेमिस्टरची मार्क शीट जमा न केल्याने निकाल राखून ठेवल्याचे सांगितले. तर, विद्यार्थ्याला एटीकेटी लागल्याने विद्यापीठाकडून निकाल आला नसल्याचे महाविद्यालयाने सांगितले आहे. मात्र, प्राजक्ता हिने मात्र आपल्याला केटी नसल्याचे सांगितले.
एप्रिल-मे मध्ये झालेल्या पदवी परीक्षेचा निकाल जूनपर्यंत लागतो. सध्या सर्वच निकाल प्रथम आॅनलाइनद्वारे जाहीर होतात. त्यानंतर काही दिवसांतच त्याचे मार्कशीट मिळते. जूनमध्ये प्राजक्ता महाविद्यालयात मार्क शीट घेण्यासाठी गेली असता तिला विद्यापीठाकडून मार्क शीट आले नसल्याचे क्लार्कने सांगितले. निकाल लागून सध्या सहा महिने होत आले तरी मार्कशीट मिळालेले नाही. त्यामुळे तिला विद्यापीठाच्या कलिना येथील दुरस्थ शिक्षण विभागातून एमएचे शिक्षण घेताना त्रास होत आहे.
विद्यापीठातून तिला लिंक मिळत नसल्याने दुरस्थ विभागाचे लेक्चर कधी सुरू होणार आहेत किंवा इतर कोणतीही माहिती मिळत नाही. या विभागातर्फे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये काही लेक्चर घेतले जातात. हे लेक्चर ७ डिसेंबरपासून सुरू होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विद्यापीठातून तिला लिंक ओपन करून माहिती घ्या, असे सांगितले जात आहे. मूळ मार्कशीटची प्रत न दिल्याने ही लिंक ओपन होत नाही. शिवाय, परीक्षा देता येणार नाही. मार्कशीटमुळे सर्वच गोष्टी अडल्याचे प्राजक्ता हिने सांगितले.
केटी सोडवली असेल तर सांगितले पाहिजे
पेंढरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद महाजन यांनी सांगितले, प्राजक्ता प्रधान यांना एसवायबीएच्या चौथ्या सेमिस्टरला केटी लागली आहे. जोपर्यंत केटी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यापीठाकडून रिझल्ट मिळत नाही. त्या निकालावर आरईएल लिहिले आहे. प्राजक्ता यांनी एटीकेटी सोडवली असेल त्यांनी आम्हाला सांगितले पाहिजे. वारंवार विद्यापीठाला पत्र पाठवावे लागते. १५ आॅक्टोबर २०१९ ला पत्र पाठविले आहे. १७ आॅक्टोबरला विद्यापीठाचा शिक्का आहे. ३७ विद्यार्थ्यांचा निकाल आरईएल आहे. त्यापैकी चार मुले पुढे आली असून, त्यांचा निकाल विद्यापीठाकडे पाठविला आहे. चार ते पाच विद्यार्थ्यांनी फी भरली नाही. त्यांच्याशी बोलून आम्ही त्यांना निकाल देतो.