राज्य नाट्यस्पर्धेचा निकाल गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 03:26 AM2017-12-29T03:26:01+5:302017-12-29T03:26:11+5:30

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कलासंचालनालयाच्या नाट्य विभागातर्फे पार पडलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धच्या प्राथमिक फेरीचा कल्याण केंद्राचा निकाल अद्यापही लागलेला नाही.

Results of State Drama Competition | राज्य नाट्यस्पर्धेचा निकाल गुलदस्त्यात

राज्य नाट्यस्पर्धेचा निकाल गुलदस्त्यात

Next

प्रशांत माने 
कल्याण : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कलासंचालनालयाच्या नाट्य विभागातर्फे पार पडलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धच्या प्राथमिक फेरीचा कल्याण केंद्राचा निकाल अद्यापही लागलेला नाही. स्पर्धा होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटल्यावरही निकाल जाहीर न होण्यामागे गौडबंगाल काय? असा प्रश्न स्पर्धेतील सहभागी हौशी नाट्यसंस्थांना पडला आहे. स्पर्धा संपली, की लागलीच दुसºया दिवशी निकाल दिला जातो. परंतु निकाल इतक्या विलंबाने लागणे आजवरच्या इतिहासात कधीच घडलेले नाही, अशी मते जाणकारांकडून व्यक्त होत आहेत.
महाराष्ट्र राज्य नाट्य विभागातर्फे संपूर्ण राज्यभरात २५ ते २६ ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण केंद्रावरील स्पर्धा ६ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत २४ हौशी नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. नेहमी या स्पर्धा कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडतात. परंतु डागडुजीच्या कामासाठी ते रंगमंदिर बंद असल्याने या स्पर्धा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले कलामंदिरात घेण्यात आल्या. स्पर्धा संपली की त्या रात्रीच निकालाचे काम परीक्षकांकडून पूर्ण केले जाते आणि तो निकाल सीलबंद पध्दतीने केंद्र समन्वयाकडे दिला जातो. समन्वयकाकडून तो सांस्कृतिक संचालनालयाकडे पाठवला जातो. मग संबंधित कला संचालनालय कार्यालयाकडून निकाल जाहीर केला जातो. ही प्रक्रिया साधारण दोन दिवस चालते. परंतु आजमितीला आठ दिवसांचा कालावधी उलटूनही निकाल जाहीर झालेला नाही. राज्यातील इतर केंद्रावरील निकाल जाहीर झाला असताना कल्याण केंद्रावरील निकालाला विलंब का? असा सवाल उपस्थित होत आहे. कल्याण केंद्राच्या समन्वयकांकडूनही योग्य प्रकारे उत्तरे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
>अंतिम स्पर्धेसाठी
तयारी कशी करायची?
राज्य नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडल्यानंतर यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक म्हणून तीन नाटके निवडली जातात. याचबरोबर उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रकाशन, अभिनय म्हणूनही गौरविण्यात येते. प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावलेली दोन नाटके अंतिम फेरीसाठी पाठविली जातात. ही स्पर्धा साधारण जानेवारी महिन्यात होते. परंतु कल्याण केंद्राचा निकाल जाहीर न झाल्याने नेमका प्रथम आणि द्वितीय क्रमांक कोणाला मिळाला आहे, याची माहिती मिळालेली नाही. अंतिम स्पर्धेची तारीखही जवळ आल्याने त्या स्पर्धेसाठी तयारी करायची की नाही व ती कशी, असा यक्षप्रश्नही सहभागी स्पर्धकांना पडला आहे.
>‘असे कधीच घडले नाही’ : आजवरचा इतिहास पाहता स्पर्धा संपताच दुसºया किंवा तिसºया दिवशी निकाल दिला जातो. परंतु कल्याण केंद्राचा निकाल तब्बल आठ दिवस उलटूनही लागत नाही हे चुकीचे आहे. सहभागी नाट्यसंस्था आतुरतेने निकालाची वाट पाहात आहेत. विलंब का होतोय याबाबत संबंधित सांस्कृतिक कलासंचालनालयाने तातडीने माहिती द्यावी, असे मत नाट्य परिषद कल्याण शाखेचे उपाध्यक्ष सुरेश पवार यांनी व्यक्त केले.
>‘निकाल त्या दिवशीच पाठविला’ : यासंदर्भात केंद्र समन्वयक सुधीर रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता, माझी जबाबदारी ही केंद्र समन्वयक म्हणून होती. ज्या दिवशी स्पर्धा पार पडली त्यादिवशीच परीक्षकांकडून निकाल घेऊन तो सीलबंद अवस्थेत सांस्कृतिक कलासंचालनालयाकडे पाठविला आहे. निकाल जाहीर करायला विलंब का लागला, याबाबत मी काहीही सांगू शकत नाही असे ते म्हणाले.

Web Title: Results of State Drama Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण