जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्रांचे वाटप पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:39+5:302021-07-09T04:25:39+5:30
ठाणे : गेल्या एक ते सव्वा वर्षापासून ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना (सामान्य) शासकीय रुग्णालयातून दिव्यांगांना मिळणारे प्रमाणपत्र वाटपाचे काम ...
ठाणे : गेल्या एक ते सव्वा वर्षापासून ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना (सामान्य) शासकीय रुग्णालयातून दिव्यांगांना मिळणारे प्रमाणपत्र वाटपाचे काम कोरोनामुळे थांबविण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व रुग्णसंख्याही घटल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने बुधवारपासून दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी २० जणांना हे प्रमाणपत्र वितरित केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
आठवड्याच्या बुधवारी ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना (सामान्य) शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप केले जात आहे. ते मिळावे यासाठी दिव्यांग पाल्याला घेऊन त्यांचे पालक रुग्णालयात जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातून येतात. मात्र, २०२० च्या एप्रिल महिन्यांपासून रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर झाल्याने हे वाटप बंद केले होते. पहिली आणि त्यानंतर आलेली कोरोनाची दुसरी लाट यामध्ये जवळपास सव्वा वर्ष निघून गेले. यामध्ये दिव्यांग आणि त्यांच्या पालकांना या प्रमाणपत्रांसाठी खूप त्रास सहन करावा लागला. परंतु, आता रुग्णसंख्या कमी झाल्याने ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिव्यांग प्रमाणपत्र बुधवारी वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी शहरासह ग्रामीण भागातून ३५ ते ४० दिव्यांग आणि त्यांच्या पालकांनी हे प्रमाणपत्र घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली होती. त्यानुसार रुग्णालयातील डॉक्टरांची टीम येणाऱ्या दिव्यांगांची तपासणी करून प्रमाणपत्र वाटप करत होती.
‘कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने अखेर दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात केली. बुधवारी पहिल्या दिवशी २० जणांना प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे.’
- डॉ. अशोक कांबळे, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे