भिवंडीतील किरकोळ विक्रेत्यांना मिळणार दहा हजारांचा पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 03:51 PM2020-07-31T15:51:18+5:302020-07-31T15:51:31+5:30
गुरुवारी भिवंडी महानगरपालिका शहर फेरीवाला समितीची बैठक घेण्यात आली त्या वेळी हे आवाहन करण्यात आले.
भिवंडी - शहरातील पदपथावर व्यवसाय करणाऱ्या पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून त्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर योजने अंतर्गत पदपथ विक्रेत्यांना 10 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. शहरातील पथ विक्रेते यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भिवंडी महानगरपालिका उपायुक्त मुख्यालय दीपक सावंत यांनी केले आहे. गुरुवारी भिवंडी महानगरपालिका शहर फेरीवाला समितीची बैठक घेण्यात आली त्या वेळी हे आवाहन करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात ज्या फेरीवाल्यांचा रोजगार गेलेला आहे. अशा सर्व फेरीवाल्यांना या पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधीची रक्कम रुपये दहा हजार कर्ज अनुदान स्वरूपात देण्यात येणार असून नगर पथ विक्रेता समितीचे कार्य व रूपरेषा व त्यांना ओळखपत्र देणे या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे, समितीने फेरीवाला सर्वेक्षणात मदत करणे, सर्व किरकोळ फेरीवाला याचे सर्वेक्षण करणे तसेच प्रत्येक फेरीवाला कर्ज अनुदानाचा लाभ मिळणे आवश्यक आहे.
या कर्ज अनुदान योजनेचा लाभ घेणेसाठी फेरीवाले यांनी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. दरम्यान या संदर्भात कोणत्याही स्वरूपाची अडचण असल्यास महापालिकेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या कक्षाशी संपर्क साधावा असे उपायुक्त मुख्यालय दीपक सावंत यांनी स्पष्ट करीत जास्तीत जास्त किरकोळ फेरीवाले,विक्रेते यानी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिके तर्फे करण्यात आले आहे.