‘परिवहन’च्या निवृत्त सदस्यांना तीन महिने मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:09+5:302021-03-05T04:40:09+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीमधील सहा सदस्य रविवारी विहीत कालावधीअंती निवृत्त झाले. परिवहन सदस्यांची निवड नगरसेवकांकडून महासभेत केली ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीमधील सहा सदस्य रविवारी विहीत कालावधीअंती निवृत्त झाले. परिवहन सदस्यांची निवड नगरसेवकांकडून महासभेत केली जाते; परंतु नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्या सदस्यांच्या निवडीला ब्रेक लागला असतानाच निवृत्त झालेल्या सदस्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, सभा घेण्यावर घातलेले निर्बंध कायम राहणार असल्याने कालावधी वाढूनही ही समिती नामधारीच राहणार आहे.
परिवहन समितीमधील सदस्यांना चार वर्षांचा कालावधी मिळतो. सभापती मनोज चौधरी, संजय पावशे, प्रसाद माळी, कल्पेश जोशी, संजय राणे या सदस्यांसह कोरोनामुळे निधन झालेले सदस्य मधुकर यशवंतराव यांचा कालावधी रविवारी संपुष्टात आला. कोरोनामुळे मनपाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यात नोव्हेंबरमध्ये नगरसेवकांचा कालावधीही संपला आहे. त्यात परिवहनच्या निवृत्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेलाही चाप बसला आहे. त्यामुळे ही सहा पदे मनपा निवडणूक होईपर्यंत रिक्तच राहतील, असे जाणकारांचे म्हणणे होते.
दरम्यान, निवडीसंदर्भात निर्माण झालेल्या पेचावर मनपा सचिव संजय जाधव यांनी विधी विभागाकडे अभिप्राय मागितला होता. त्यानुसार महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील २५ (७) मधील तरतुदीनुसार निवृत्त झालेल्या सदस्यांना २ मार्चपासून पुढे तीन महिन्यांची मुदतवाढ दिली असल्याची माहिती जाधव यांनी दिली. या निर्णयामुळे निवृत्त झालेल्या सदस्यांना दिलासा मिळाला असला तरी सभा घेण्याचे अधिकार सभापती आणि सदस्यांना नाहीत. त्यामुळे परिवहन समितीची सभा घेण्याची गेले काही महिन्यांपासून सुरू असलेली मागणी कागदावरच राहण्याची शक्यता आहे.
---------------------