‘पैसे परत द्या; अन्यथा प्रचारसभेत जाळून घेईन’
By admin | Published: February 15, 2017 04:40 AM2017-02-15T04:40:45+5:302017-02-15T04:40:45+5:30
उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचे एमआयएममधील प्रकरण निवडणुकीच्या तोंडावर चिघळले असून उमेदवारीसाठी घेतलेले पैसे परत द्या;
मुंब्रा : उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचे एमआयएममधील प्रकरण निवडणुकीच्या तोंडावर चिघळले असून उमेदवारीसाठी घेतलेले पैसे परत द्या; अन्यथा पक्षाच्या प्रचारसभेत जाळून घेईन, असा इशारा पक्षाचे माजी स्थानिक नेते ताजुद्दीन युनूस खान यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मुस्लिम समाजात हरामचे पैसे घेण्यास परवानगी नाही. मात्र मुस्लिमांसाठी काम करतो, असे सांगणाऱ्या एमआयएम या पक्षाने उमेदवारांकडून २०-२० लाख उकळले. उमेदवारीच्या नावे पक्षाचे नेते खंडणी मागत आहेत. माझ्याकडूनही त्यांनी उमेदवारीसाठी २० लाखांची मागणी करत प्रत्यक्षात पाच लाख घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या पक्षापासून मतदारांनी दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रकरणी एमआयएमच्या त्या पुढाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली. याची स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत संबंधितांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या आरोपांवर एमआयएमने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ताजुद्दीन हे एमआयएमचे मुंब्रा येथील उमेदवार होते. एमआयएमचे पदाधिकारी असतानाही पक्षाच्या हैदराबाद येथील नेत्यांनी त्यांच्याकडे उमेदवारीसाठी २५ लाख मागितले होते. मात्र ताजुद्दीन यांनी पाच लाख दिल्याचा त्यांचा दावा आहे. आणखी २० हजार देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविल्याने पक्षाने अन्य उमेदवाराला २० लाखांत दिल्याचा आरोप ते करत आहेत.
एमआयएम हा पक्ष मुस्लिम हितासाठी काम करीत नाही. धर्मात कोणाकडूनही असे अवैधरित्या पैसे घेण्यास मनाई असतानाही पक्षाचे नेते हे कृत्य करत आहेत. त्यामुळे समाज बदनाम होत आहे. म्हणून मी त्या पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा दावाही त्यांनी केला. हैदराबादच्या त्या नेत्यांकडून माझे पाच लाख रु पये पोलिसांनी परत मिळवून द्यावे आणि त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. माझे पाच लाख रु पये परत दिले नाहीत, तर एमएआयएमच्या प्रचाराच्या सभेत मी रॉकेल ओतून पेटवून घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)