दोन महिन्यांनी परतले मायदेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:29 AM2020-06-01T00:29:42+5:302020-06-01T00:29:48+5:30
ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देण्यासाठी सफर : ठाणेकर सायकलस्वाराची कथा
स्रेहा पावसकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देण्यासाठी मार्चमध्ये १० महिन्यांच्या नियोजित सायकलसफरीवर निघालेले ठाणेकर राजेश खांडेकर हे अर्जेंटिनातील लॉकडाउनमुळे तेथेच अडकले होते. तब्बल दोन महिन्यांनंतर गुरुवारी रात्री ते ठाण्यात परतले. या दोन महिन्यांच्या कालावधीत आलेले विविध अनुभव त्यांनी ‘लोकमत’सोबत शेअर केले. यादरम्यानच्या कठीण प्रसंगात डोंबिवली सायकल क्लब, अर्जेंटिनातील इंडियन कम्युनिटी, भारतीय दूतावास हे देवदूतच ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
वर्तकनगर येथे राहणारे राजेश खांडेकर हे व्यावसायिक आहेत. वाढते ग्लोबल वॉर्मिंग पाहता राजेश हे विविध देशांतून सायकलसफरी करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात. यापूर्वी त्यांनी अनेक सफरी केल्या आहेत. यंदा अर्जेंटिना ते कॅनडा अशा १७ देशांतून राजेश यांची मार्च २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यानची सफर नियोजित होती. १६ मार्च रोजी सफर सुरू करून ते २२ मार्चला अर्जेंटिनाची राजधानी असलेल्या ब्युनूस आयरस शहरात पोहोचले. तिथे १९ मार्चपासूनच लॉकडाउन सुरू झाल्याने पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी आणि वैद्यकीय तपासणी केली. तेथील भारतीय दूतावासाच्या मध्यस्थीनंतर राजेश यांची अर्जेंटिनातील एका हॉटेलमध्ये सोय केली गेली. लॉकडाउन संपण्याची वाट पाहत हॉटेलमध्ये तब्बल ३८ दिवस राहिल्यानंतर राजेश यांनी खर्चासाठी सोबत नेलेले पैसै संपले. त्यांनी डोंबिवली सायकल क्लबशी संपर्क केला. त्यामाध्यमातून पुण्यातील शरद जाधव यांनी त्यांना अर्जेंटिनात राहणारे उमेश गुप्ता यांचा नंबर दिला आणि राजेश हे पुढील १२ दिवस गुप्ता यांच्या घरी राहिले. मात्र, लॉकडाउन संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. याचदरम्यान चिली देशाचे विमान त्यांच्या नागरिकांना घेण्यासाठी अर्जेंटिनात येणार असल्याची माहिती भारतीय दूतावासाने राजेश यांना दिली. त्यांच्या विनंतीवरून अर्जेंटिनात राजेश यांच्यासह ७० भारतीयांनाही त्या विमानात प्रवेश मिळाला. या प्रवासाचे शुल्क सुमारे एक लाख १५ हजार रुपये (१३२५ डॉलर) होते. राजेश यांच्या हातात पैसे नव्हते. त्यांनी तेथील इंडियन कम्युनिटीला संपर्क केला आणि त्याचे प्रमुख मनोज मेघानी हे देवासारखे धावून आले.
अर्जेंटिनातील इंडियन कम्युनिटीने राजेश यांना ८०० डॉलरची मदत केली, तर उर्वरित ५२५ डॉलर भारतीय दूतावासांनी कर्जाऊ दिले आणि सुमारे ४० तासांचा अर्जेंटिना- चिली- आॅस्ट्रेलिया- बँकॉक असा प्रवास करून ते दिल्लीत आले. भारतातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दिल्लीत त्यांना सात दिवस क्वारंटाइन केले गेले. त्यानंतर ट्रेनने बॉम्बे सेंट्रल आणि तिथून ठाणे असा प्रवास करत ते दोन महिन्यांनंतर सहीसलामत स्वगृही परतले.
या कालावधीत अर्जेंटिनातही कडक लॉकडाउन होते. पोलीस आणि प्रशासनाच्या सूचनांचे लोक तंतोतंत पालन करत होते. आपल्याकडेही नागरिकांनी त्याचप्रकारे लॉकडाउनचे नियम पाळले पाहिजे. या संपूर्ण प्रवासात मला अर्जेंटिनातील नागरिकांचे, मार्गदर्शक उमेश ठाकूर आणि विविध हितचिंतकांचे सहकार्य मिळाले. पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेल्या कामाची दखल घेत मला इंडियन कम्युनिटीने ८०० डॉलर भेट दिले. माझी सफर अर्धवट राहिल्याची खंत आहे, मात्र, कोरोनानंतर मी ती नक्की पूर्ण करेन.
- राजेश खांडेकर, सायकलस्वार