पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:32+5:302021-07-16T04:27:32+5:30

ठाणे : कोरोनामुळे महापालिकेला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ठाणे महापालिकेच्या पाणी ...

The revenue and expenditure of the water supply department did not match | पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसेना

पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसेना

Next

ठाणे : कोरोनामुळे महापालिकेला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला मात्र पाणी खरेदी आणि इतर खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त होत असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका ज्या ज्या प्राधिकरणांकडून पाणी विकत घेत आहे, त्यांनी मागील काही वर्षांत पाण्याचे दर वाढविल्याने खरेदीपोटी पालिकेला वर्षाला २२५ कोटींच्या आसपास खर्च करावा लागत आहे. देखभाल दुरुस्ती, विजेवर होणारा खर्चदेखील २० कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे जवळजवळ २४५ कोटींचा वार्षिक खर्च पाणी पुरवठा विभागाला सहन करावा लागत असताना उत्पन्न मात्र १५० कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे पालिकेला २०२०-२१ मध्ये उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने ७५.४८ कोटींच्या वाढीव खर्चाचा भार सोसावा लागला आहे.

मागील काही वर्षांत पाणी खरेदीवर पालिकेचा अधिकचा खर्च होत आहे. याशिवाय विविध प्राधिकरणाकडून वारंवार पाणी खरेदीचे दर वाढविण्यात येत असल्याने पाणी पुरवठा विभागाला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा तीन वर्षांचा विचार केल्यास २०१८-१९ मध्ये १२३.३६ कोटींचे उत्पन्न मिळाले होते; परंतु खर्च हा १८९.९६ कोटींचा झाला होता. हा फरक ६६.६० कोटींचा होता. २०१९-२० मध्ये उत्पन्न १३१.१८ कोटींचे असताना खर्च मात्र १९५.५८ कोटींचा झाला होता. यातील फरक हा ६४.४० कोटींचा दिसून आला. २०२०-२१ मध्ये १४९.७५ कोटींचे उत्पन्न असताना खर्च मात्र २२५.२३ कोटींचा झाल्याचे दिसून आले आहे. हा फरक ७५.४८ कोटी एवढा आहे.

पाणी खरेदीसाठी वर्षाला १३० कोटींचा खर्च

एमआयडीसी, मुंबई महापालिका, स्टेम, भातसा आदींकडून महापालिका पाणी खरेदी करीत आहे. यासाठी १०२ कोटींची तरतूद केली असतानाही त्यासाठी १२९ कोटी ३५ लाख ११ हजार १७२ रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये स्टेमला वार्षिक - ४३ कोटी ९० लाख ६४ हजार ३९७ रुपये, स्टेमला ४४ कोटी ३१ लाख २७ हजार ४९८ रुपये, भातसाला ८ कोटी ८१ लाख २ हजार ७७१ रुपये आणि मुंबई महापालिकेला ३२ कोटी ३२ लाख १६ हजार ५०६ रुपये वार्षिक मोजले जात आहेत.

विजेचा खर्च वाढला

पाणी पुरवठा विभागामार्फत पाणी पुरवठ्यावर विजेचादेखील खर्च होत आहे. दरवर्षी या खर्चातदेखील वाढ होत आहे. २०१८-१९ रोजी ३४.७२ कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर २०१९-२० मध्ये हा खर्च ३७.०३ कोटी आणि २०२०-२१ मध्ये हा खर्च ३८.०१ कोटी एवढा झाला आहे.

पाणी खरेदीचे दर वाढले

ठाणे महापालिका विविध प्राधिकरणाकडून पाणी उचलत आहे; परंतु मुंबई महापालिकेने पाण्याचे दर वाढविल्याने त्याचा फटका पालिकेला सहन करावा लागत आहे.

प्राधिकरणाचे नाव - दशलक्ष - पूर्वीचे दर - आताचे दर

भातसा - २०० - ५.५० रुपये - ५.५० रुपये

स्टेम - ११० - १०.३० - १०.५०

एमआयडीसी - ११० - ९ रुपये - ९ रुपये

मुंबई महापालिका - ६५ - ८ रुपये - १२.३० रुपये

पाणी दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला

ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी मागील वर्षी पाणी दरवाढीचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला होता; परंतु त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. मीटरद्वारे पाणी देणाऱ्यांकडून १ हजार लीटरमागे १३ रुपये आकारण्याचा हा प्रस्ताव होता; परंतु त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा दर हजार लीटरमागे आजही ७.५० रुपये एवढाच आहे. त्यामुळे किमान हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी याची मदत झाली असती, असेही सांगण्यात येत आहे.

............

Web Title: The revenue and expenditure of the water supply department did not match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.