समीक्षक हा लेखक व वाचक यांमधील दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:54+5:302021-09-23T04:46:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : समीक्षक हा लेखक व वाचक यांच्यातील दुवा असतो. प्रतिभा कणेकर यांनी परिस्थितीचे पूर्ण आकलन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : समीक्षक हा लेखक व वाचक यांच्यातील दुवा असतो. प्रतिभा कणेकर यांनी परिस्थितीचे पूर्ण आकलन करून समीक्षेतील संज्ञा उलगडून दाखवल्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका, समीक्षिका मीना वैशंपायन यांनी शनिवारी केले. पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सृजनसंवाद प्रकाशनतर्फे डाॅ. प्रतिभा कणेकर यांचा ‘कौलं उडालेलं घर’ या कथासंग्रहाचे व ‘वेचलेली अक्षरे’ या समीक्षा ग्रंथाचे ऑनलाइन प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक प्रा. एम. पी. पाटील यांच्या हस्ते झाले. प्रख्यात कवयित्री नीरजा म्हणाल्या, प्रतिभा कणेकर या म. सु. पाटील यांच्या समीक्षेचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांच्या कथांमधील पात्रांमध्ये स्त्रीवादाचा अभ्यास झिरपत गेला आहे.
सृजनसंवादचे संपादक गीतेश शिंदे म्हणाले, वाचनप्रवासात मी समीक्षेतले कंगोरे शोधण्याचा प्रयत्न करत होतो. या पुस्तकनिर्मिती दरम्यान स्त्री केंद्री कथांचे वेगळे भावविश्व अनुभवता आले. लेखिका डाॅ. कणेकर यांनी त्यांचे गुरू, ज्येष्ठ समीक्षक डाॅ. म. सु. पाटील यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले. वाचक अभिप्राय कळवतो तेव्हा ते पुस्तक पूर्ण होते असेही त्या म्हणाल्या.
ज्येष्ठ लेखक प्रा. एम. पी. पाटील यांनी त्यांच्या मानसकन्येचे साहित्य ग्रंथरूपात आले याबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजया पाटील यांनी तर तपस्या नेवे यांनी आभार मानले.
समीक्षा ग्रंथाचे पैलू उलगडले
नीरजा यांनी डाॅ. कणेकर यांच्या कथांचे तर डॉ. वैशंपायन यांनी समीक्षा ग्रंथाचे पैलू उलगडून दाखवले. समीक्षकाकडे कालयित्री व भावयित्री प्रतिभा या दोन प्रकारच्या प्रतिभा असणे महत्त्वाचे असते. लेखिकेकडे त्या दोन्ही असून त्यांची भावयित्री प्रतिभा अधिक प्रभावी आहे. साहित्यकृतीमागच्या मानवी प्रेरणा, घटीत, अंतर्यामी सत्य ही समीक्षा शोधते.
-------------