नेवाळी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:31 PM2018-07-12T17:31:42+5:302018-07-12T17:32:03+5:30
नेवाळी येथील जमीन संरक्षण खात्याने ताब्यात घेण्याच्या विरोधात ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
ठाणे – नेवाळी येथील जमीन संरक्षण खात्याने ताब्यात घेण्याच्या विरोधात ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्याच्या दालनात गुरुवारी ही भेट झाली. गुन्हे मागे घेण्याबाबतीत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेटीनंतर सांगितले.
अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरातील येथील सुमारे १६७० एकर जमीन ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान तात्पुरत्या वापरासाठी ताब्यात घेतली होती. मात्र, महायुद्ध संपल्यानंतरही ही जमीन मूळ मालकांना परत करण्यात आली नाही. स्वातंत्र्योत्तर काळात या जमिनीवर संरक्षण खात्याचा ताबा दाखवण्यात आला आणि आता ही जमीन नौदलाची असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. मात्र, नेवाळी आणि परिसरातील ग्रामस्थांचा याला विरोध असून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. खा. डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नेवाळी येथील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे जाऊन तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेटही घेतली होती.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये जबरदस्तीने जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता आंदोलनाचा भडका उडाला होता. अनेक शेतकऱ्यांना त्यावेळी अटक झाली होती. नेवाळीचे तत्कालीन सरपंच चैनू जाधव यांच्यासह अनेक आंदोलक काही महिने तुरुंगात होते.
या आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जावेत, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणिकर, रुपेश म्हात्रे, चैनू जाधव, आदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपूर विधिमंडळातील दालनात गुरुवारी भेट घेतली. याप्रसंगी भाजपचे आमदार किसन कथोरे, मंदा म्हात्रे हेही उपस्थित होते. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.