हंगामी भातशेतीसाठी भातसाचे पाणी
By admin | Published: November 16, 2015 02:04 AM2015-11-16T02:04:29+5:302015-11-16T02:04:29+5:30
भातसा कालव्याचे पाणी २०१५-१६ च्या सिंचन हंगामात शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वासिंद : भातसा कालव्याचे पाणी २०१५-१६ च्या सिंचन हंगामात शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
भातसा धरणातून वसईकडे गेलेल्या भातसा उजव्या कालव्याद्वारे किमी २ ते ५४ दरम्यानच्या शेतकऱ्यांना हंगामी स्वरूपात भातशेती व भाजीपाला करण्याकरिता दरवर्षी पाणी सोडले जाते. या वर्षी पाऊस कमी पडल्याने ते सोडले जाणार नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली होती. त्यामुळे हंगाम लागवडीसह वीटभट्टी व्यावसायिक, या पाण्यावर अवलंबित छोटे धंदेवाईक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, या वर्षी कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशा प्रकारच्या कुठल्याही नोटिसा बजावल्या नसून ते शेतीसाठी उपलब्ध केले जाणार आहे.
दरम्यान, या उजव्या कालव्यांतर्गत ५५ गावपाडे ओलिताखाली असून १४९० हेक्टर लागवड क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. तसेच गेल्या तीन-चार
वर्षांपासून कालव्याची दुरुस्ती व साफसफाईची कामे झालेली नाहीत. त्यामुळे पाण्याची वहनक्षमता कमी झाली असून ठिकठिकाणी कालव्याला गळतीचे प्रमाण अधिक आहे.
याबाबत, शेतकऱ्यांची नाराजी असून पाणीगळती रोखणे व कालव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने याकडे लक्ष वेधावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्याबाबत पाटबंधारे खाते काय करते, याकडे लक्ष लागले आहे.