रिक्षा व्यवसाय अद्यापही थंडच, मालक-चालक चिंतित; रेल्वे सेवेवरच व्यवसाय अवलंबून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:53 AM2020-08-26T00:53:27+5:302020-08-26T00:53:46+5:30
कल्याण-डोंबिवलीकर नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात ये-जा करतात. त्यामुळे ते बहुतांशी वाहतुकीसाठी रेल्वेवरच अवलंबून आहेत.
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊन शिथिल होऊन पंधरवड्यापेक्षा अधिक दिवस झाले तरी व्यवसाय हवा तसा तेजीत येत नसल्याने रिक्षामालक-चालक चिंतित आहेत. मार्चअखेरीपासून लॉकडाऊन असल्याने रिक्षा व्यावसायिक आधीच घरात होते. तर, आता लॉकडाऊन झाल्यानंतरही प्रवाशांच्या प्रतीक्षेत रस्त्यावर वेळ जात आहे. दिवसाकाठी जेमतेम ४०० ते ५०० रुपये धंदा होत आहे. लोकल सेवा सुरू होत नाही तोपर्यंत व्यवसायाला झळाळी येणार नाही, असे मत रिक्षा चालकांनी व्यक्त केले.
कल्याण-डोंबिवलीकर नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात ये-जा करतात. त्यामुळे ते बहुतांशी वाहतुकीसाठी रेल्वेवरच अवलंबून आहेत. डोंबिवलीमधून सुमारे साडेचार लाख, तर कल्याणमधून अडीच लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यापैकी बहुतांशी नागरिक हे घर ते रेल्वे स्थानक रिक्षानेच प्रवास करतात. रेल्वेवरच व्यवसाय अवलंबून असल्याचे मत रिक्षाचालकांनी व्यक्त केले.
लॉकडाऊन शिथिल झाल्याने दुकाने, बाजारपेठा उघडल्या आहेत. रक्षाबंधन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी तेथे गर्दी झाली. मात्र, रिक्षांना प्रवासीच नाहीत. दुसरीकडे खाजगी कंपन्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काही कर्मचारी कंपन्यांच्या खाजगी बस तसेच एसटीने प्रवास करतात. अत्यावश्यक सेवेतील बहुतांश प्रवासी दुचाकीनेच रेल्वे स्थानक गाठतात. त्यामुळे रिक्षा व्यवसायाला तेजी नाही.
आताही १५ दिवसांपासून सकाळचे ६ ते ९ वाजेपर्यंतचे तीन तास सोडले, तर अन्य वेळी फारसा व्यवसायच होत नाही, असे रिक्षाचालकांनी सांगितले. डोंबिवली पूर्वेला इंदिरा गांधी चौक, पाटकर रस्ता, केळकर तसेच रामनगर स्टॅण्ड परिसरात रिक्षा दिसतात. मात्र, तेजी नसल्याने अनेक रिक्षा चालक दुपारनंतर वाहन बाहेर काढत नाहीत.
रेल्वे सेवेवरच रिक्षा व्यवसाय अवलंबून आहे, असे म्हणणे वावगे नाही. अजूनही व्यवसायाला तेजी नाही. जेमतेम ४०० रुपये सरासरी व्यवसाय होत आहे. तातडीने रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे. - दत्ता माळेकर, कल्याण जिल्हाध्यक्ष, वाहतूक सेल भाजप
रिक्षाव्यावसायिक आता घरातून बाहेर पडले आहेत. पण, त्यांना प्रवासी मिळत नाहीत. कसाबसा दिवस निघत असला तरी चिंता कायम आहे. आणखी रिक्षा रस्त्यावर आल्यास जो धंदा होतो तोही होणार नाही. - काळू कोमासकर, अध्यक्ष, लालबावटा रिक्षा युनियन