मारहाणींच्या निषेधार्थ डोंबिवलीत रिक्षाचालकांचा बंद, प्रवाशांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 10:58 AM2018-03-09T10:58:12+5:302018-03-09T11:02:15+5:30
रिक्षाचालक मारहाण प्रकरणी जुन्या डोंबिवलीत रिक्षा चालकांनी बंद पुकारला आहे. पश्चिमेकडील जुन्या डोंबिवली येथे सुमारे 150 रिक्षांचा स्टँड आहे.
डोंबिवली - रिक्षाचालक मारहाण प्रकरणी जुन्या डोंबिवलीत रिक्षा चालकांनी बंद पुकारला आहे. पश्चिमेकडील जुन्या डोंबिवली येथे सुमारे 150 रिक्षांचा स्टँड आहे. त्या ठिकाणी रिक्षाचालकाने रिक्षा स्टँडमध्ये घुसवल्याचा जाब विचारणा-या विलास पंडित या स्टँड प्रमुखाला प्रशांत आणि कुणाल ठाकूर आणि पाटील नामक आशा तिघांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (9 मार्च) सकाळी घडली. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रिक्षा चालकांवर होणारी मारहाण, दडपशाही यामुळे काहींनी एकत्र येत रिक्षा बंद ची हाक दिली. त्यामुळे जुन्या डोंबिवलीतील स्टँड बंद झाले असून प्रवाशांचे हाल झाले आहेत. या ठिकाणाहून डोंबिवलीसह कोपर येथे जाण्यासाठी प्रवासी ताटकळले आहेत. भांडण ज्याचे झाले त्यांनी ते सोडवावे पण रिक्षा सुरू कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे. पण जोपर्यंत मारहाण करणा-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत रिक्षा सुरू न करण्याचा पवित्रा काही चालकांनी घेतला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात रिक्षा चालक जमा झाले असून आधी कारवाई करा नंतर रिक्षा रस्त्यावर येतील, अशी नारेबाजी पोलीस ठाण्यात केल्याने काही काळ तणाव झाला होता. आता पोलीस चौकशी करत असून रिक्षाचालकांनी शांत राहावे, असे आवाहन रिक्षाचालक मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी केले आहे.
न्याय न मिळाल्यास डोंबिवली पश्चिम येथील सर्व रिक्षा बंद करण्यात येतील, असेही जोशी यांनी 'लोकमत'ला सांगितले. अकार्यक्षम वाहतूक पोलीस अधिकारी यांच्यामुळे अशा घटना सातत्याने घडत असल्याची टीका रिक्षा चालकांनी केली. जर कारवाई झाली नाही तर संध्याकाळी शहरातील पश्चिमेच्या दीनदयाळ, स्टेशन रोड, फुले आणि सुभाष रोड येथील सुमारे 1 हजार रिक्षा बंद राहतील, अशी भूमिका सर्वच युनियनच्या रिक्षा प्रमुखांनी घेतल्याची माहिती जोशी यांनी दिली. विष्णुनगर पोलीस ठाण्याने याची गंभीर दखल घेतली असून त्या तीन मारेकऱ्यांना पोलीस ठाण्यात हजर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचेही जोशी म्हणाले.