ठाण्यात धावत्या रिक्षावर झाड पडून रिक्षाचालकासह प्रवाशाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:47+5:302021-04-23T04:42:47+5:30
ठाणे : मासुंदा तलाव परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका रिक्षावर अचानक झाड कोसळल्यामुळे त्याखाली दबून रिक्षाचालक अरविंद राजभर (२८, ...
ठाणे : मासुंदा तलाव परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका रिक्षावर अचानक झाड कोसळल्यामुळे त्याखाली दबून रिक्षाचालक अरविंद राजभर (२८, रा. वागळे इस्टेट, ठाणे) आणि प्रवासी चंद्रकांत केशव पाटील (५८, रा. रबाले, नवी मुंबई) या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. ठाणे महापालिकेच्या हलगर्जीमुळे ही घटना घडल्याचा आरोप करून पालिका प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतांच्या नातेवाइकांनी गुरुवारी केली.
रिक्षाचालक अरविंद राजभर हे बुधवारी रात्री प्रवासी चंद्रकांत पाटील यांना घेऊन गडकरी रंगायतन येथून ठाणे रेल्वे स्थानकाकडे निघाले होते. ते डॉ. मूस रोड येथे आले असताना अचानक एक झाड उन्मळून त्यांच्या रिक्षावर पडले. झाडाच्या वजनामुळे राजभर आणि पाटील हे दोघेही दबले जाऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने रिक्षावर पडलेले झाड हटविण्याचे काम हाती घेत, रिक्षाचालकासह प्रवाशालाही वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाने केले. मात्र, ही मदत मिळेपर्यंत उशीर झाला होता. झाड हटविल्यावर दोघांनाही तात्काळ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सहायक पाेलीस निरीक्षक पाेटे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
* दरम्यान, गडकरी रंगायतनजवळ सुरू असलेल्या पदपथाच्या कामामुळे झाड कमकुवत झाले होते. यात ठाणे महापालिकेच्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा असून ठाणे महापालिकेने याची नुकसानभरपाई द्यावी, तसेच मुलाला नोकरीत घ्यावे, अशी मागणी पाटील कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात गुरुवारी आपला संताप व्यक्त करताना केली होती. त्यांचा मृतदेहदेखील ताब्यात न घेण्याचा पवित्रा या कुटुंबाने घेतला होता. नंतर दोन्ही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.