कोकेन विक्रीसाठी आलेल्या दोघा नायजेरियनसह रिक्षाचालक जेरबंद ; ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By अजित मांडके | Published: April 1, 2023 06:28 PM2023-04-01T18:28:38+5:302023-04-01T18:29:12+5:30
दोन्ही नायजेरियन हे नालासोपारा येथे वास्तव्यास आल्याचे समोर आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे - कासारवडवली,आनंदनगर आणि वागळे इस्टेट, इंदिरानगर या दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत कोकेन व एलएसडी असे अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या पॉल चुकवु (४८) आणि गोक लॉरेन्स अजाह (३२) या दोघा नायजेरियन व्यक्तीसह रिक्षाचालक लक्ष्मण अनिरूध्द साव (२७) अशा तिघांना ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेच्या युनिट ५ जेरबंद केले. त्यांच्याकडून एकूण ६१ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये १४७ ग्रॅम वजनाचा कोकेनचा समावेश आहे. तसेच ते दोन्ही नायजेरियन हे नालासोपारा येथे वास्तव्यास आल्याचे समोर आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
वागळे युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना २९ मार्च २०२३ रोजी घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे पॉल चुकवु नामक नायजेरियन इसम हा कोकेन अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. अशी माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करत, त्याला ताब्यात घेतले. तसेच यावेळी त्याच्याकडून १२ लाख ८० हजार रुपये किमतीचे ३२ ग्रॅम कोकेन व १ लाख २० हजार रुपये किंमतीचे ०.२२ ग्रॅम वजनाचे L.S.D १५ नग डॉट हा अंमली पदार्थ व १ हजार ९४० रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकुण १४ लाख ०१ हजार ९४० रुपये किंमतीचा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली. तसेच वागळे इस्टेट, इंदिरानगर येथे रिक्षातुन गोक अजाह नामक नायजेरीयन इसम कोकेनची विक्रिसाठी येत आहे. अशी माहिती मिळाल्यावर त्या नायजेरियन याच्यासह मुंबईतील साव नामक रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४६ लाखांचा ११५ ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ, १ लाखांची रिक्षा व रोख एक हजार एकुण ४७ लाख ०१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
त्या दोन्ही प्रकरणात गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखा वागळे युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक, अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक, शिवाजी कानडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल अहिरे, पोलीस हवालदार सुशांत पालांडे, रोहीदास रावते, प्रकाश पाटील, विजय काटकर, सुनिल निकम, न्हावळदे, सुनिल रावते, संदिप शिंदे, मिनाक्षी मोहीते, सुनिता गिते, पोलीस नाईक रघुनाथ गार्डे, उत्तम शेळके,
ठाणेकर, यश यादव या पथकाने केली आहे.