रिक्षा चालकाची तरुणीस मारहाण
By admin | Published: July 7, 2017 09:52 PM2017-07-07T21:52:37+5:302017-07-07T21:52:37+5:30
आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी रिक्षा न नेल्यामुळे संतापलेल्या एका १९ वर्षीय प्रवासी तरुणीने महेंद्र अरुण पितळे (४९, रा. आझादनगर, कॅसलमिल, ठाणे) या रिक्षा चालकाशी
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 07 - आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी रिक्षा न नेल्यामुळे संतापलेल्या एका १९ वर्षीय प्रवासी तरुणीने महेंद्र अरुण पितळे (४९, रा. आझादनगर, कॅसलमिल, ठाणे) या रिक्षा चालकाशी वाद घातला. याच वादातून त्याने तिला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. दरम्यान, त्या तरुणीनेही आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पितळे यानेही ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली.
खोपट भागातून जाणाऱ्या पितळे याच्या शेअर रिक्षात ही तरुणी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास बसली. खोपटच्या चौकातून तिने चरईला रिक्षा नेण्याचा आग्रह धरला. त्याने मात्र रिक्षा टेंभीनाका मार्गे जाईल, असे स्पष्ट केले. तिला दगडी शाळेकडे जायचे असल्यामुळे त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे त्याने तिला मूस चौकात मारहाण केली. यातून चवताळल्यामुळे तिनेही त्याला मारहाण केली. अखेर प्रकरण ठाणेनगर पोलीस ठाण्यात आल्यानंतर मुलीने आधी मारहाण केल्यानंतर आपणही तिला मारल्याचा रिक्षा चालकाने दावा केला. तर त्यानेच आपल्याला मारहाण केल्याची उलट तक्रार या तरुणीने पोलिसांना दिली. मुळात, या मुलीने जो मार्ग दाखविला होता, तो ‘नो एन्ट्री’चा होता. त्यामुळेच रिक्षा त्या मार्गाने जाऊ शकत नव्हती, असेही पितळे याने स्पष्ट केले. पोलिसांनी अखेर दोघांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार नोंदविली असून साधी अदखलपात्र तक्रार असल्यामुळे कोणालाही अटक केलेली नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
रिक्षा चालकांची वाढती आरेरावी...
राबोडीच्या शिवाजीनगर येथील सिकंदर शेख या रिक्षाचालकानेही नौपाड्यातील २५ वर्षीय तरुणीला अलोक हॉटेलच्या जवळ बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नजरेने इशारा करून विनयभंग केला. तिने याचा जाब विचारत त्याच्या श्रीमुखात लगावली होती. त्यानेही चुक कबूल करण्याऐवजी त्या तरुणीलाच जबर मारहाण केली. याप्रकरणी मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर शेखला पोलिसांनी अटक केली. अवघ्या एकच दिवसाच्या अंतरावर पुन्हा तरुणीला मारहाणीचा प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.