रिक्षाचालकाची प्रवाशाला मारहाण
By admin | Published: February 16, 2017 02:03 AM2017-02-16T02:03:27+5:302017-02-16T02:03:27+5:30
भिवंडीत रिक्षाचालकाने एसटी बसचालकाला, तर ठाण्यात प्रवाशाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतही
डोंबिवली : भिवंडीत रिक्षाचालकाने एसटी बसचालकाला, तर ठाण्यात प्रवाशाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतही रिक्षाचालकाने एका प्रवाशाला मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात घडली. वाहतूक पोलिसांना तो रिक्षाचालक सापडला, पण तक्रार नसल्याने कारवाई कशी करायची, असा सवाल पोलिसांनी केला. अखेर, त्या रिक्षाचालकाला केवळ तोंडी समज देण्यात आली.
इंदिरा गांधी चौकातून लोढा, मानपाडा, शनी मंदिर, काटई आदी परिसरांत जाणाऱ्या रिक्षा सुटतात. रिक्षाचालकांनी इंदिरा गांधी चौकातील पनवेल एसटी बसथांबा बळकावत तेथे रिक्षांचे बेकायदा स्टॅण्ड सुरू केले आहे. या स्टॅण्डवर बुधवारी मानपाडा येथे जाण्यासाठी आलेला एक प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये बाचाबाची झाली. त्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केली. या वेळी अन्य रिक्षाचालकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. अन्य एका प्रवाशाने मध्यस्थी करत भांडण सोडवले. या घटनेची माहिती वाहतूक पोलीस सागर दिवटे, वॉर्डन निलेश झेमसे, राजेश शहाणे यांना माहिती मिळताच त्यांनी चालकाला शोधले. परंतु, तक्रार नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकाला समज देऊन सोडून देण्याचा तोंडी आदेश दिला. त्यामुळे चालकाला सोडून द्यावे लागल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)