भिवंडी महानगरपालिका मुख्यालय आवारात रिक्षा चालकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:49 PM2018-09-18T12:49:04+5:302018-09-18T12:53:51+5:30
भिवंडी महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या आवारातील झाडाला गळफास घेऊन एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
भिवंडी - भिवंडी महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या आवारातील झाडाला गळफास घेऊन एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (18 सप्टेंबर ) सकाळी ही घटना उघडकीस आली. गुलाम नबी शेख (45) असे आत्महत्या करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
गुलाम नबी शेख हे गुलजार नगर, नुरानी मस्जीद जवळ राहत होते. रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबियांचे पालन पोषण करत होते. परंतु दोन वर्षांपूर्वी पत्नीसोबत झालेल्या कौटुंबिक वादानंतर पत्नी दोन मुलांसह वेगळी झाली. त्यानंतर गुलाम नबी हे मानसिक तणावात असल्याची माहिती त्याचे भाऊ गुलाम मोहम्मद याने दिली आहे. काल रात्री दीड वाजताच्या सुमारास ते घरी रिक्षा घेऊन आले व त्यानंतर पुन्हा घराबाहेर गेल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
मंगळवारी सकाळी महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या संरक्षक भिंती लगत असलेल्या झाडाच्या फांदीला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. ही दुर्घटना ज्या ठिकाणी घडली ते घटनास्थळ मनपा मुख्यालय प्रवेशदाराच्या अगदी समोर असुन त्याठिकाणी चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे .