कर्जाचे हप्ते भरण्यसाठी बँकांकडून लावण्यात येत असलेल्या तगाद्याविरोधात रिक्षाचालक करणार लाक्षणिक उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 10:36 AM2020-09-18T10:36:39+5:302020-09-18T10:37:12+5:30
डोंबिवली - कर्ज फेडीसाठी बँका आणि वित्तीय संस्थाकडून होणारा त्रास थांबत नसून तो वाढतच असल्याने राज्य शासन, बँका आणि ...
डोंबिवली - कर्ज फेडीसाठी बँका आणि वित्तीय संस्थाकडून होणारा त्रास थांबत नसून तो वाढतच असल्याने राज्य शासन, बँका आणि अन्य खासगी वित्तीय संस्थांच्या विरोधात 24 सप्टेंबर, गुरुवार रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, आंदोलन करणार असल्याची माहिती भाजप कल्याण जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी दिली.
रिक्षा चालकांच्या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंदिरा गांधी चौक ,डोंबिवली पूर्व येथे कोविडच्या काळात फिजिकल डिस्टन्ससह कायदा सुव्यवस्थेचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्राने कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी केवळ तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत केव्हाच संपली आहे .रेल्वे सेवा कदाचित ऑक्टोबर दरम्यान सुरु होतील मात्र शाळा महाविद्यालये डिसेंबर पर्यंत सुरु होतील ,अशी चिन्हे दिसत नाही. त्यामुळे तोपर्यंत रिक्षाचालकांचा व्यवसाय होणार नाही, हे लक्षात घेवून रिक्षाचालकांनी घेतलेले कर्ज परतफेड करण्यासाठी असणारी मुदत डिसेंबर अखेर पर्यंत वाढवावी, ही प्रमुख मागणी आहे.
शासन निर्णयानुसार नवीन रिक्षा घेण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे. मात्र कोविड प्रादुर्भाव वाढल्यानंतर मार्च पासून पाच महिने राज्यात लॉक डाऊन होता. त्यावेळी केंद्र सरकारने कोणत्याही कर्जदाराला थकीत वसुलीसाठी त्रास देवू नये, असे स्पष्ट बजावले होते. मात्र तरीही देखील वित्तीय संस्थांमार्फत रिक्षाचालकांना नाहक त्रास देण्याचे सत्र सुरूच आहे. आता सप्टेंबरमध्ये अनलॉक झाले असले तरी सर्व उद्योग व्यवसाय पूर्णतः सुरु झालेले नाहीत . प्रवासी मिळत नाहीत . कोविडचा प्रादुर्भाव अजूनही ओसरलेला नाही ,त्यातच सोशल डीस्टसिंगचे नियमामुळे प्रवाशांनी रिक्षाकडे पाठ फिरवली असल्याने अपेक्षेप्रमाणे रिक्षाचालकांचा व्यवसायच होत नाही . या व्यवसायातून इंधनाचे पैसे देखील मिळत नाही ,अशी गंभीत स्थिती असल्याने रिक्षाचालक मानसिक तणावाखाली असल्याचे ते म्हणाले .