जुनी डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 01:13 AM2019-08-13T01:13:43+5:302019-08-13T01:14:23+5:30

डोंबिवली शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत.

Rickshaw drivers Extinguished pits in Old dombivli | जुनी डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

जुनी डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

Next

डोंबिवली : शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. ते भरण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे हतबल झालेल्या जुनी डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी स्वत:हून पुढाकार घेत नुकतेच हे खड्डे भरले.

जुनी डोंबिवली येथील स्टॅण्डवर जवळपास २०० रिक्षाचालक अनेक वर्षे व्यवसाय करतात. सध्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने प्रवाशांना समाधानकारक सुविधा देता येत नसल्याची खंत स्टॅण्डप्रमुख विलास पंडित, मॅक्सी तिरोडकर, प्रकाश जनकर, प्रकाश बागडे, सुरेश पवार, अ‍ॅनेक्स फर्नांडिस, अरुण कोचरेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

ते म्हणाले की, खड्ड्यांची दयनीय अवस्था ही काही यंदाची नाही. दरवर्षी रस्त्यांवर खड्डे असतातच. त्याकडे लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करतात, हे माहीत नाही. गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले हे रिक्षात प्रवासी म्हणून बसले की, पोटात गोळा येतो. खड्ड्यात रिक्षा गेली आणि त्यांना काही झाले तर काय करायचे, असा मोठा पेच पडतो, असे कोचरेकर सांगतात.

पंडित म्हणाले की, तक्रारी तरी किती करायच्या. रिक्षाचालकांना अंग, कंबरदुखीचा त्रास होत आहे. अनेकांना वयोमानाप्रमाणे छातीचे विकार आहेत. संपूर्ण शरीराची हेळसांड होत आहे. दुसरीकडे खड्ड्यांतून रिक्षा गेल्याने गाडीचेही नुकसान होते. त्यामुळे अखेरीस आम्हीच खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. जोंधळे शाळा परिसर, देवी चौक या मार्गावरील २० मोठे खड्डे गुरुवारपासून बुजवले. परंतु, जुनी डोंबिवली ते गिरिजामाता मंदिर परिसरात १० इंचांचे खड्डे पडले असून ते भरणे कठीण आहे. डेब्रिज टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. डेब्रिज टाकून समस्या सुटणार नाही, हे माहिती आहे, पण तरीही प्रशासनाला समस्या दिसावी आणि प्रवाशांना आम्ही भाडे का नाकारतो, हे समजावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. वाहतूक शाखा, आरटीओ अधिकारी यांनीही या समस्येकडे लक्ष द्यावे आणि महापालिका प्रशासनाला रस्ते दुरुस्त करण्याचे आवाहन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

महापालिका प्रशासनाने चांगले रस्ते द्यावेत, जेणेकरून आम्हाला प्रवाशांना चांगली सुविधा देता येईल तसेच आमचे आरोग्यही राखले जाईल, असेही रिक्षाचालक म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणेही या पश्चिमेत राहत असून, त्यांचाही हा येण्याजाण्याचा मुख्य रस्ता आहे.त्यामुळे त्यांनी येथील खड्ड्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही रिक्षाचालकांनी केली.

यासंदर्भात महापौर राणे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेऊन तातडीने खड्डे भरण्याबाबत संबंधितांना आदेश दिले जातील, असे सांगितले. 

अतिपावसामुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आधी जुनी डोंबिवली येथील रस्ते ठीक होते. आता पाऊस कमी झाला की, रस्त्यांची कामे करून घेऊ.
- विश्वनाथ राणे, नगरसेवक व
रहिवासी जुनी डोंबिवली

Web Title: Rickshaw drivers Extinguished pits in Old dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.