रिक्षा चालकांनो ‘प्रवासी ग्राहक देवो भव:’ विद्यार्थ्यांनी केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 06:31 PM2018-08-27T18:31:43+5:302018-08-27T18:32:15+5:30
ग्राहक आणि रिक्षाचालक यांच्यात सतत तू तू मैं मैं होत असते. रिक्षाचालक ग्राहकांशी अरेरावीची भाषा करीत असतात. तेव्हा रिक्षाचालकांनी ग्राहकांशी आपुलकीने वागावे यासाठी सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘ग्राहक देवो भव :’ म्हणत त्यांना एक पत्र दिले आहे.
कल्याण : ग्राहक आणि रिक्षाचालक यांच्यात सतत तू तू मैं मैं होत असते. रिक्षाचालक ग्राहकांशी अरेरावीची भाषा करीत असतात. तेव्हा रिक्षाचालकांनी ग्राहकांशी आपुलकीने वागावे यासाठी सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘ग्राहक देवो भव :’ म्हणत त्यांना एक पत्र दिले आहे. तसेच त्यांनी रिक्षा व रिक्षाचालकांना राखी बांधून अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन साजरे केले.
पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक हायस्कूल शाळेतील विद्याथ्र्यानी आज सकाळी कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांना पत्र दिले. कल्याण-डोंबिवली शहरात खड्डेमय रस्ते आणि वाढती वाहतूक कोंडीमुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक पोलिस, आरटीओ आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एकत्र येऊन दिलासा द्यावा. त्यासाठी रिक्षाचालकांच्या माध्यमातून संदेश जावा, रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे ही दिले जावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना नगरसेवक आणि रिक्षा टॅक्सी संघटना अध्यक्ष प्रकाश पेणकर, संतोष नवले, आरटीओचे वाहन निरीक्षक जाफर काझी, डी. के . महाले, शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, संगीता पाटील, शोभा देशमुख, ओमप्रकाश धनविजय, गणोश पाटील आणि रेल्वे पोलिस आधिकारी शिक्षकवर्ग उपस्थित होता.
विद्यार्थिनींनी दिलेल्या पत्रात तुमचा व्यवसाय लोकांच्या सेवाकरिता आहे. तेव्हा लोकांशी अतिशय गोड बोलले पाहिजे. कोणत्याही व्यवसायात मग तो डॉक्टर असो किंवा वकील ते आपल्याकडे येणा-या व्यक्तीशी गोड बोलतात. ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास तो निर्धास्त होऊन प्रवास करू शकेल. त्यामुळे व्यवसायात भरच पडेल. भाडे नाकरू नका. तीन सीट्सनंतर प्रवाशांना चौथ्या सीटसाठी ताटकळत ठेवू नका. वाढत्या खाजगी वाहनांमुळे व्यवसाय कमी होत आहे. त्यातच रिक्षाचाच वापर टाळण्याकडे लोकांचा कल आहे. भविष्यात या व्यवसायावर गदा येऊ नये म्हणून आतापासूनच विचार करा या आशयाचे पत्र देण्यात आले.
या आगळ्य़ा वेगळ्य़ा उपक्रमांचे सर्वानी स्वागत करीत एकत्र येऊन वाहतूक कोंडी दूर करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी वर्गाला दिले.