विलंब शुल्काच्या निषेधार्थ रिक्षा चालक, रणरागिणींचे धरणे आंदाेलन
By सुरेश लोखंडे | Published: July 11, 2024 04:36 PM2024-07-11T16:36:39+5:302024-07-11T16:37:06+5:30
परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या विलंब शुल्काचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे.
ठाणे : परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या विलंब शुल्काचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. हा जीजीया कर असल्याचा आराेप करून ताे त्वरीत बंद करण्यात यावा या मागणीसाठी ठाणे शहर टॅक्सी रिक्षा चालक मालक कृती समिती व रणरागिणी महिला रिक्षा चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदाेलन छेडले. या वेळी केंद्र व राज्य शासनाच्या या निर्णयाचा या रिक्षा चालकांनी निषेध केला.
येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या पुरूष व महिला रिक्षा चालकांनी धरणे आंदाेलन केले. या आंदाेलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी ठाणे शहर रिक्षा चालक मालक कृती समितीचे अध्यक्ष अनंता सावंत व 'रणरागिणी 'महिला रिक्षाचालक मालक माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या. विलंब शुल्काच्या निर्णयचा निषेध करून रिक्षा, टॅक्सी वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखे पासून ५० रुपये प्रतिदिवस शुल्क आकारणी त्वरित बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी या रिक्षा चालकांनी धरणे आंदोलन छेडले.