लॉकडाउननंतर रिक्षाभाडेवाढ अटळ; प्रवाशांना भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 01:07 AM2020-05-28T01:07:47+5:302020-05-28T01:07:50+5:30
फिजिकल डिस्टन्सिंगमुळे प्रवासीसंख्येवर मर्यादा
- प्रशांत माने
कल्याण : लॉकडाउनमुळे दोन महिने व्यवसाय बंद असल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच लॉकडाउननंतर फिजिकल डिस्टन्सिंगमुळे रिक्षातून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येवरही मर्यादा येणार आहे. त्यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी रिक्षाचालकांकडून भाडेवाढ केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, आरटीओकडून भाडेवाढीला मान्यता मिळण्यापूर्वीच छुप्या भाडेवाढीचा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागणार आहे.
कोरोनामुळे १८ मार्चपासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे जगणे कठीण झाल्याने रिक्षाचालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली होती. मात्र, ती मंजूर झाली नाही. उपासमारीची वेळ आल्याने मुंबई आणि ठाण्यातून सुमारे २५० ते ३०० रिक्षाचालकांनी रिक्षासह गावची वाट धरली आहे. दरम्यान, परराज्यात गेलेल्या रिक्षाचालकांची अधिकृत नोंदही रिक्षासंघटनांकडे नाही.
कल्याण-डोंबिवलीत २८ हजार रिक्षा असून, त्यातील ९० टक्के रिक्षा शेअर पद्धतीने चालतात. काही रिक्षाचालक गावी गेल्याने ऐन पावसाळ्यात रिक्षांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. जूनमध्ये लॉकडाउन शिथिल झाल्यास काही अटीशर्थींचे पालन करूनच रिक्षाचालकांना व्यवसायास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. शेअर रिक्षात दोघांनाच प्रवासाची मुभा असेल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेअर रिक्षाचालक तिसºया व चौथ्या प्रवाशाचे भाडे दोघा प्रवाशांकडून वसूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअरचे भाडे २० ते २५ टक्क्यांनी वाढले, अशी सूत्रांची माहिती आहे.
सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रिक्षा प्रवास सुरू करायचा की नाही, त्याबाबत एमएमआरटीए जो निर्णय देईल, त्याप्रमाणे नियोजन केले जाईल. भाडेवाढीचा निर्णय हा धोरणात्मक आहे. राज्य सरकारकडून ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाईल.
- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण
दोन महिने व्यवसाय बंद असल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा चालविण्यास परवानगी मिळाली तर फिजिकल डिस्टन्सिंगमुळे प्रवासीसंख्येवर मर्यादा येणार आहेत. रिक्षाचालकाचे नुकसान भरून काढण्यासाठी भाडेवाढ करणे हे अटळ आहे. आरटीओकडून जे भाडे ठरविले जाईल, ते स्वीकारण्याची आमची तयारी आहे. लॉकडाउनमुळे प्रवाशांना भुर्दंड पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी दरवाढीचे फलक लावले जातील.
- प्रकाश पेणकर,अध्यक्ष, रिक्षा-टॅक्सी महासंघ