रिक्षा भाडेवाढीने सर्वसामान्यांचे गणित आणखी कोलमडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:47 AM2021-03-01T04:47:52+5:302021-03-01T04:47:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात २५ हजार, तर जिल्हाभर सव्वालाखांच्या घरात अधिकृत रिक्षांची संख्या आहे. सध्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात २५ हजार, तर जिल्हाभर सव्वालाखांच्या घरात अधिकृत रिक्षांची संख्या आहे. सध्या १८ रुपये प्रती दीड किलोमीटर असलेल्या प्रवासी मीटर भाड्यात तीन रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे ते एकदम २१ रुपयांवर जाणार आहे. आधीच पेट्रोलसह इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असतानाच, आता या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित आणखी कोलमडणार आहे. रिक्षा चालकांनी मात्र या भाडेवाढीचे समर्थन केले आहे.
कोरोनाच्या काळात रिक्षा चालकांनी नियमांचे पालन केले. मात्र, अनलॉकनंतर अनेक नियमांचे रिक्षा चालकांकडून सर्रास उल्लंघन होत आहे. दोनऐवजी चार ते पाच प्रवाशांची वाहतूक बेकायदेशीरपणे केली जाते. मास्क आणि सॅनिटायझरही अनेक रिक्षांमधून गायब झाले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे रिक्षांनाही भाडेवाढ लागू केली आहे. खरे तर शहरी भागात सीएनजीवरील रिक्षांचे प्रमाण जास्त असताना, ही भाडेवाढ होणे योग्य नसल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे. ही भाडेवाढ करण्याआधीच लोकमान्यनगर ते ठाणे रेल्वे स्थानक शेअररिंगच्या रिक्षामध्ये १८ रुपये भाडे लॉकडाऊनच्या आधी लागत होते. ते नंतर प्रति प्रवासी थेट ३० रुपये केले. ठाणे ते कळवादरम्यानचे भाडे १२ वरून १५ रुपये झाले. माजीवडा येथील प्रवासासाठीही २० वरून ३० रुपये केले आहेत. ठाणे स्थानक ते मानपाडा ३० वरून ४० रुपये केले आहेत. अशा अनेक ठिकाणी रिक्षा चालकांनी अघोषित भाडेवाढ प्रवाशांवर लादलेलीच होती, तशी ती सध्याही सुरू आहे. मीटरवरील काही रिक्षा चालकांनी प्रामाणिकपणे व्यवसाय केला. यात अनेकांवर कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली. अनेकांना बँकेचे हप्ते भरणेही मुश्कील झाले, परंतु काहींनी याही काळात ठाण्यातून घोडबंदर आणि मीरा रोड किंवा भिवंडीत जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे घेतले. सध्याही ठाणे स्थानकातून मीरा रोड किंवा भिवंडीला जाण्यासाठी मीटरने ४०० ते ४५० रुपये होतात. त्याऐवजी ६०० ते ७०० रुपयांचे बोली भाडे सांगितले जाते. यात नवखा प्रवासी असेल, तर त्याच्याकडून याहीपेक्षा जास्त भाडे उकळले जाते. तीनहात नाका येथूनही घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाडे आकारले जाते. जांभळी नाका येथून रेल्वे स्थानक भागातून नौपाडा किंवा तीनहात नाका भागाकडे जाण्यासाठी भाडे नाकारले जाते. नौपाड्यातून ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठीही रिक्षा मिळत नाही. अनेकदा प्रवाशांसोबत अरेरावी केली जाते. भाडेवाढ करताना ती एकदम तीन रुपये नको, रिक्षा चालकांनीही सौजन्याने वागणूक दिली पाहिजे, अशा माफक अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.
.............
मुळात, २०१५ नंतर रिक्षाची भाडेवाढ झालेली नव्हती. भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी खटुआ यांच्या समितीने सुचविलेली भाडेवाढ शासनाने मान्य केली आहे. ती सुरुवातीच्या दीड किलोमीटरसाठी १८ वरून २१ रुपये होणार आहे.
जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
..........................
रिक्षा प्रवासाची भाडेवाढ ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. जसे पेट्रोल, डिझेलचे दर वाढले, तसे खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणे अपेक्षित आहे. तसे झाले, तर रिक्षाप्रमाणे इतरही महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार नाही.
सरिता कांबळे, प्रवासी, ठाणे
..........................
सहा वर्षांपासून रिक्षाची भाडेवाढ नव्हती. सर्व स्पेअर पार्टच्या आणि सीएनजीच्या दरातही गेल्या सहा वर्षांत वाढ झाली. कोरोना काळातही रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे ही भाडेवाढ योग्यच आहे.
सुनिल वाघमारे, रिक्षा चालक, ठाणे
....................
शासनाने केलेली ही भाडेवाढ आहे. सर्वसामान्य रिक्षा चालकांना यातून दिलासा मिळेल.
बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर
.................
भाडेवाढीचा निर्णय उत्तम. कोरोनाचे जे संकट आहे, त्यावर काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल.
रवींद्र पाफाळे, रिक्षा चालक, मानपाडा, ठाणे
...........................
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे पगार निम्मे झालेत. त्यात रिक्षाची भाडेवाढ होणे, म्हणजे सामान्य प्रवाशांना मोठा भुर्दंड पडणार आहे. भाडेवाढ आणखी काही कालांतराने व्हायला अपेक्षित होती.
उत्तम लोखंडे, प्रवासी, ठाणे