दोनऐवजी तीन, चार प्रवासी भरुनही रिक्षाभाडे २० रुपयेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:45 AM2021-08-12T04:45:06+5:302021-08-12T04:45:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: कोविड काळात कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी रिक्षाचे भाडे २० रुपये देऊन केवळ दोन प्रवासी घेण्याचे आवाहन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: कोविड काळात कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी रिक्षाचे भाडे २० रुपये देऊन केवळ दोन प्रवासी घेण्याचे आवाहन आरटीओने केले होते. आता नियम काहीसे शिथिल होताच, दोनऐवजी तीन आणि प्रसंगी चार प्रवासी भरूनही भाडे मात्र प्रत्येकी २० रुपये आकारून प्रवाशांची लूट सुरू आहे. याला आरटीओ जबाबदार असून त्यांनी तत्काळ सुधारित शेअर रिक्षाभाड्याचे फलक जागोजागी लावावे असे रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व्हेअभावी सुधारित भाडे फलक अद्याप लागले नसून, त्याचा भुर्दंड सामान्य प्रवाशांना रोजच सोसावा लागत आहे.
आरटीओ अधिकारी, रिक्षा युनियन, वाहतूक नियंत्रण पोलीस अधिकारी, महापालिकेचे अधिकारी या यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने एक समिती तयार करून पाहणी अहवाल तयार करण्यात यावा, असे मध्यंतरी ठरवण्यात आले होते. महापालिका आयुक्तांनी त्यासंदर्भात बैठक घेतल्याचे लाल बावटा रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष काळू कोमासकर यांनी सांगितले. त्यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर महापालिका किंवा आरटीओ स्वतः ते भाडे जाहीर करेल असे ठरले होते. पण अद्याप या सर्व्हेचा पत्ताच नाही. आरटीओ इथे येतच नसल्याची नाराजी रिक्षा चालकांनी व्यक्त केली. त्यामुळे जोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचे फलक लागत नाही, तोपर्यंत २० रुपये शेअर भाडे आकारण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे मत काही रिक्षा चालकांनी व्यक्त केले.
---------
कोविड सुरू झाल्यापासून अपवाद वगळता दीड वर्षात आरटीओ अधिकारी डोंबिवलीत आलेले नाहीत. नवे आरटीओ तानाजी चव्हाण यांनीही इथला दौरा अद्याप केलेला नाही, असेही वाहनचालकांनी सांगितले. त्यामुळे सर्व्हे लांबणीवर पडला असून, सुधारित भाडे आकारणीचे फलक लागलेले नाहीत.
--------------
रिक्षा प्रवासाला अजूनही कोविड नियमावली लागूच आहे. अजूनही सुधारित नियम आलेले नाहीत. त्यामुळे रिक्षा चालक तीन, चार प्रवासी नेत असले तरी दोनऐवजी तीन प्रवासी न्यावेत असे शासनाने जाहीर केलेलं नाही. त्यामुळे यावर आरटीओ, वाहतूक पोलिसांनी अंकुश ठेवावा. तो नसल्याने बिनदिक्कतपणे कोविड नियमावली धाब्यावर बसवून अवैध वाहतूक सुरू असल्याचे वास्तव शहरात सर्वत्र दिसत आहे.
---------------
कोविड काळात पूर्ण क्षमतेने कर्मचारी नव्हते. शासन नियमानुसार कामकाज सुरू होते. त्यामुळे डोंबिवलीसह अन्यत्र सुधारित रिक्षा भाडे आकारणीसंदर्भात सर्व्हेचे काम प्रलंबित आहे. आता अधिकारी आले असून लवकरच ते काम करण्यात येणार आहे. मात्र अजूनही दोन प्रवासीच नेण्याचे मार्गदर्शक तत्त्व सांगते. त्यानुसार प्रवाशांनी व रिक्षा चालकाने नियमाचे पालन करावे.
तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण
---------------
आम्ही तीन प्रवासी घेत असलो तरी भाडे १० रुपये घेतोय. आरटीओने सर्व्हे करणे गरजेचे आहे. तो न केल्याने रिक्षा चालकांचे नुकसान होत आहे. त्यातही कोविड काळात रिक्षा चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. कुटुंबाची वाताहत सुरू असून आरटीओने लवकरात लवकर सर्व्हे करावा आणि भाडे आकारणीची समस्या सोडवावी.
दत्ता माळेकर, अध्यक्ष, भाजप, कल्याण जिल्हा वाहतूक सेल
----------------------