लसीकरण करुन घरी परतणाऱ्या पित्यासह मुलीला रिक्षाची धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 22:16 IST2021-08-20T22:14:21+5:302021-08-20T22:16:41+5:30
लुईसवाडी येथील महावीर रुग्णालय येथून कोरोना प्रतिबंधक लस घेऊन घरी पायी परतणाºया राजेश गोसर (५३, रा. शिवाजीनगर, मुलूंड चेक नाका, वागळे इस्टेट, ठाणे) आणि त्यांची मुलगी पंक्ती (२५) यांना एका रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

लसीकरण करुन घरी परतणाऱ्या पित्यासह मुलीला रिक्षाची धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लुईसवाडी येथील महावीर रुग्णालय येथून कोरोना प्रतिबंधक लस घेऊन घरी पायी परतणाºया राजेश गोसर (५३, रा. शिवाजीनगर, मुलूंड चेक नाका, वागळे इस्टेट, ठाणे) आणि त्यांची मुलगी पंक्ती (२५) यांना एका रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पंक्ती आणि तिचे वडिल राजेश असे दोघेजण १७ आॅगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास लुईसवाडी महावीर हॉस्पीटल येथून कोरोनावरील लस घेऊन रोड क्रमांक १६ येथून मॉडेला चेक नाक्याच्या दिशेने रस्त्याच्या कडेने पायी जात होते. त्याचवेळी एमआयडीसी मुलूंड चेकनाका येथे त्यांच्या पाठीमागून आलेल्या वसीम अन्सारी यांच्या रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात राजेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पंक्तीला किरकोळ मार लागला आहे. त्यांना सुरुवातीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते. नंतर मुलूंड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पंक्तीवर उपचारानंतर तिने याप्रकरणी १८ आॅगस्ट रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार दिली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.