कल्याण-डोंबिवलीत रिक्षाचे मीटर डाऊनच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:14+5:302021-09-23T04:46:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा स्टॅण्डचे सोमवारी नव्याने सर्वेक्षण होणार आहे. शेअर आणि मीटर प्रमाणे रिक्षा पार्किंग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा स्टॅण्डचे सोमवारी नव्याने सर्वेक्षण होणार आहे. शेअर आणि मीटर प्रमाणे रिक्षा पार्किंग करण्याच्या क्षमतेसाठी हे सर्वेक्षण होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ई-मीटरची सक्ती असताना या शहरांतील रिक्षा शेअर पद्धतीने चालविल्या जात आहेत. मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्याच्या नियमाकडे कल्याण आरटीओनेही दुर्लक्ष केल्याने प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू आहे. शेअर व्यतिरिक्त रिक्षातून थेट प्रवास करणाऱ्याला मीटर टाकले जात नसल्याने किमान भाडेही दुपटीने द्यावे लागत आहे.
परवान्यांच्या खिरापतीत दोन्ही शहरांत रिक्षांची संख्या भरमसाठ वाढली आहे. नियमानुसार रिक्षा मीटरप्रमाणे चालवणे अपेक्षित आहे. परंतु, शेअर पद्धतीमुळे रिक्षातील मीटर हे शोभेपुरतेच राहिले आहे. २०१३ ला तत्कालीन आरटीओ अधिकारी संजय डोळे यांच्या कार्यकाळात मीटरप्रमाणे रिक्षा सुरू होत्या. ते स्वत: रस्त्यावर उतरून मीटर चालू स्थितीत आहेत का? याची तपासणी करत असत. पण मागील काही वर्षात केवळ रिक्षातील मीटरवर पासिंग होत आहे. पण रिक्षा मीटरप्रमाणे धावत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.
मुंबई, ठाण्यातही शेअर रिक्षा पद्धत आहे. पण तेथेही मीटर बंधनकारक आहे. मग कल्याण आरटीओ हद्दीत या नियमांना तिलांजली का? असाही सवाल केला जात आहे. कल्याणमध्ये मीटरचा एकच स्टॅण्ड आहे, परंतु डोंबिवलीत त्याचा अभाव आहे. दोन्ही शहरात बहुतांश स्टॅण्ड शेअर रिक्षाचे आहेत. पण रिक्षातून थेट प्रवास करणाऱ्याकडून अव्वाच्या सव्वाभाडे वसूल केले जात आहे. शेअर रिक्षासाठी प्रवाशांकडून पसंती मिळत असल्याचा दावा रिक्षा संघटनांकडून केला जात असलातरी रिक्षातून थेट प्रवास करणाऱ्यासाठी तरी मीटर पद्धत अवलंबविण्यात यावी अशीही मागणी होत आहे. परिवहनचे कायदे, नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम आरटीओचे आहे, परंतू त्यांनी केलेले दुर्लक्ष पाहता कल्याण डोंबिवलीत रिक्षाचे मीटर डाऊनच आहे. यासंदर्भात कल्याण आरटीओचे अधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
---------
अशी होतेय प्रवाशांची लूट
- मार्चपासून लागू झालेल्या नवीन भाडेसुत्रानुसार दीड किमी या पहिल्या टप्प्यासाठी २१ रुपये भाडेदर आहे, तर पुढील प्रति किलोमीटरसाठी १४ रूपये भाडे आकारले जात आहे. परंतु, दीड आणि दोन किमीसाठी रिक्षाचालकाकडून ४० ते ५० रुपये आकारले जात आहेत.
- रेल्वे स्थानकापासून केडीएमसी मुख्यालय मीटरप्रमाणे २० रुपयेही होत नाहीत, परंतू ४० रुपये आकारले जात आहेत. हीच स्थिती रेल्वे स्थानक ते टिळकचौक, पारनाका, रामबाग येथील आहे.
- खडकपाडा वरून रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी शेअर रिक्षा मिळते, परंतु खडकपाडा येथून सिंडीकेटला थेट रिक्षाने जाणाऱ्या प्रवाशाला ६० रुपये मोजावे लागत आहेत. ही लूट थांबणार कधी असा सवाल प्रवासी करत आहेत.
------------------