रिक्षाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:49 AM2019-07-17T00:49:03+5:302019-07-17T00:49:05+5:30
कल्याण पूर्वेतील नांदिवली येथील आरटीओच्या ट्रॅकवर सध्या वाहनांच्या पासिंगला विलंब होत असल्याने त्याचा फटका चालकांना बसत आहे.
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील नांदिवली येथील आरटीओच्या ट्रॅकवर सध्या वाहनांच्या पासिंगला विलंब होत असल्याने त्याचा फटका चालकांना बसत आहे. हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांना एका फेरीत काम न झाल्यास पुन्हा तेथे जावे लागते. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडत आहे. त्याच्या निषेधार्थ डोंबिवलीतील रिक्षाचालक-मालक युनियन लवकरच आंदोलन छेडणार आहे.
वाहनतपासणी आणि पासिंगसाठी आरटीओला कल्याण पश्चिमेतील आधारवाडीनजीकची जागा अपुरी पडत होती. त्यामुळे पूर्वेला नांदिवली येथील नव्या जागेत टेस्टिंग ट्रॅक उभारण्यात आला. मात्र, सध्या पावसामुळे तेथे तांत्रिक अडचणी येत आहेत. व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग, पॅनिक मशीनची अंमलबजावणी संथगतीने होत आहे. त्यामुळे पासिंगसाठी तासन्तास थांबावे लागत आहे. पहिल्या दिवशी वाहनांचे पासिंग न झाल्यास दुसऱ्या, तिसºया दिवशीही यावे लागत आहे. परिणामी, वाहनचालक जेरीस आले आहेत.
यासंदर्भात युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी म्हणाले की, वाहनचालकांना तेथे वेठीस धरले जात आहे. अनेकदा यासंदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांना सांगूनही परिस्थितीत सुधारणा होत नाही. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचा दिवसाचा खाडा होतो. तेथे जायचे आणि तासन्तास वाट बघायची, ताटकळत बसायचे, यात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. पावसाच्या दिवसांत तेथे वाहनात किती वेळ बसणार, तसेच तेथे अन्यत्र आसरा घेण्याची सुविधा नाही. त्यामुळे वाहने आली की कामे झटपट व्हावीत, वाहनचालकांना वेगवान यंत्रप्रणाली राबवून दिलासा द्यावा, अशा मागण्यांसाठी लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य वाहनचालकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
>पत्राला केराची टोपली?
आरटीओ अधिकाºयांना या प्रश्नासंदर्भात आम्ही २५ जूनला पत्र दिले आहे. मात्र, अद्यापही परिस्थितीत कोणतीच सुुधारणा झालेली नाही. त्यामुळे आमच्या पत्राला केराची टोपली दाखवली का? रिक्षाचालकांसह सामान्य चालकांच्या समस्यांना कोणी वाली आहे की नाही? असा सवाल जोशी यांनी केला आहे.