रिक्षाचालकाची मुजोरी, प्रवासी भाडयावरून वाद; प्रवाशाला दांडक्याने मारहाण
By प्रशांत माने | Published: March 28, 2023 07:02 PM2023-03-28T19:02:18+5:302023-03-28T19:08:16+5:30
अनोळखी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
डोंबिवली: प्रवासी भाडयावरून नेहमीच रिक्षाचालक आणि प्रवाशांचे वाद होत असताना सोमवारी रात्री झालेल्या वादात रिक्षाचालकाने प्रवाशाला दांडक्याने मारहाण केल्याचा धककादायक प्रकार घडला आहे. या घटनेतून रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा एकदा दिसून आली असून हा मारहाणीचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान प्रवाशाने याबाबत रामनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
कल्याण येथे राहणारे गणेश तांबे हे सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घरी परतत होते. त्यांन डोंबिवली इंदिरा चौकातून टाटा पॉवर नाकाकडे जाण्यासाठी त्यांनी शेअर रिक्षा पकडली. दरम्यान भाडे किती घेणार असा प्रश्न रिक्षाचालकाला त्यांनी विचारला असता त्याने ३५ ते ४० रूपये होतील असे सांगितले. यावर तांबे यांनी इतके भाडे होत नाही मी नेहमी शेअर रिक्षाने प्रवास करतो. २० ते २५ रूपयेच घेतात असे समंजसपणे त्यांनी रिक्षा चालकाला सांगण्याचा प्रयत्न केला.
रिक्षाचालकाची मुजोरी, प्रवासी भाडयावरून वाद; प्रवाशाला दांडक्याने मारहाण pic.twitter.com/ohfGmG3ETP
— Lokmat (@lokmat) March 28, 2023
पण रिक्षाचालक त्याच्या निर्णयावर ठाम राहीला. यात दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी त्याठिकाणी अन्य रिक्षाचालक देखील होते. वाद पुढे वाढतच गेला यात संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने रिक्षात ठेवलेला दांडका बाहेर काढला आणि तांबे यांना मारहाण केली. या मारहाणीत तांबे जखमी झाले असून त्यांच्यावर शास्त्रीनगर रूग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे रिक्षावाल्यांची वाढती मुजोरी समोर आली आहे. प्रवासी भाडयावरून प्रवासी आणि रिक्षाचालक यांचे झालेले वाद नवीन नाहीत याआधीही असे प्रकार घडले आहेत. परंतू रिक्षाचालकांकडून प्रवाशाला दांडक्याने झालेली मारहाण चर्चेचा विषय ठरली आहे.