रिक्षाचालक बेकायदा भाडेवाढीच्या पवित्र्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:31 AM2019-01-11T05:31:35+5:302019-01-11T05:31:47+5:30
वाढत्या महागाईमुळे हतबल : ‘कोकण रिक्षा-टॅक्सी’चाही सरकारला इशारा
प्रशांत माने
कल्याण : वाढती महागाई व अनेक कारणांमुळे रिक्षा व्यवसाय डबघाईला आल्याने ‘सांगा जगायचे कसे?’, असा सवाल रिक्षाचालक करत आहेत. प्रलंबित भाडेदरवाढ विनाविलंब मिळावी, असे पत्र कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने आॅगस्टमध्ये परिवहन विभागाला पाठवले होते. परंतु, आजतागायत कोणताही निर्णय झालेला नाही. लवकर निर्णय घ्या, अन्यथा नाइलाजास्तव भाडेवाढ करावी लागेल, असा पवित्रा रिक्षाचालकांनी घेतला आहे. रिक्षाचालकांच्या या भूमिकेला पाठिंबा असेल, असे महासंघाने स्पष्ट केल्याने लवकरच बेकायदा भाडेवाढीला प्रवाशांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या दीड किलोमीटरसाठी १८ रुपये भाडे आकारले जात आहे. ते २२ रुपये करावे आणि पुढील किलोमीटरसाठी १२ रुपयांवरून १६ रुपये दरवाढ मिळावी, अशी मागणी रिक्षाचालकांची आहे. परंतु, चार वर्षे कोणतीही भाडेवाढ झालेली नाही. रिक्षा विमा, एकरकमी कर, विविध परिवहन शुल्क यामध्ये भरमसाट वाढ झाली आहे. परिणामी, दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र (पासिंग) खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वारंवार वाढणाऱ्या किमती, दैनंदिन उदरनिर्वाह गरजा, मुलाबाळांचा शैक्षणिक खर्च, आजारपण, आरोग्यविषयक खर्च हा सर्व आॅटोरिक्षाचालकांना दैनंदिन मिळणाºया उत्पन्नातूनच भागवावा लागत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.
कोकण रिजनमधील रिक्षाचालकांनी १२ जुलैला कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या नेतृत्वाखाली आरटीओ कार्यालयावर निदर्शने केली होती. या आंदोलनाला एक महिना उलटत नाही, तोच पुन्हा रिक्षा-टॅक्सी महासंघानेच पत्रप्रपंचही केला होता.
महागाई निर्देशांकानुसार दरवर्षी योग्य ती भाडेवाढ दिली पाहिजे. परंतु, सीएनजी गॅसदरात पाच रुपये प्रतिकिलो वाढ होऊनही चार वर्षे रिक्षाभाडेवाढ परिवहन विभागाने केलेली नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. परंतु, त्याकडे आजमितीला पुरते दुर्लक्ष झाले आहे.
आमच्यावर आली बेरोजगारीची संक्रांत
च्आधीच महागाईने व्यवसाय करणे जिकिरीचे बनले आहे. त्यात सरकारने रिक्षा परवाने खुले केल्याने रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावर होत आहे.
च्परवाने देण्याच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे, ही सरकारची भूमिका असली तरी दुसरीकडे यामुळे रिक्षा वाढल्याने स्पर्धा होऊन बेरोजगारीची संक्रांत आमच्यावर आल्याचे मत कल्याणमधील रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी व्यक्त केले.
रिक्षाचालकांच्या भावना लक्षात घ्या
मागील चार वर्षे भाडेवाढ नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयावर निदर्शने आणि परिवहन विभागाला पत्र देऊनही भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव भाडेवाढ करावी लागेल, हा रिक्षाचालकांनी घेतलेला पवित्रा योग्यच आहे.
सरकारने वेळीच भाडेवाढ करावी, अन्यथा आम्हाला ती करावी लागेल, असे मत कोकण रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी व्यक्त केले.