रिक्षाचालक परस्पर करताहेत प्रवाशांची पळवापळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:37 AM2020-10-07T00:37:05+5:302020-10-07T00:37:57+5:30
ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर प्रकार; कोरोनाचा कहर रोखणार कसा?
ठाणे : ठाणेमहापालिकेने रेल्वे स्टेशन परिसरात परराज्यातून येणाऱ्या मजुरांची तपासणी सुरू केली आहे. परंतु, या मोहिमेला स्टेशन परिसरातील रिक्षाचालक हरताळ फासत असून प्रवाशांची परस्पर पळवापळव करीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यात एखादा कोविड पॉझिटिव्ह प्रवासी शहरात घुसला तर कोरोनाचा कहर वाढण्याची भीती आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी महापालिकेने ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची चाचणी करण्याची मोहीम गेल्या दोन महिन्यांपासून हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २८ हजार ९३८ प्रवाशांची कोविड टेस्ट केली आहे. त्यापैकी १७६ प्रवासी बाधित सापडले असून, तत्काळ उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या मोहिमेमुळे कोरोनाची ‘एण्ट्री’ रोखण्यात यश येत असताना काही मुजोर रिक्षाचालकांमुळे या मोहिमला खो घातला जात आहे.
कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी रिक्षाचालक थेट स्थानकातील फलाटावर येऊन प्रवासी पळवत होते. आता तर त्यांनी सॅटिसवरही मजल मारली आहे. सॅटिसवर व त्याखाली जिथे कोविड टेस्ट केंद्र कार्यान्वित आहे तेथे ते गिरट्या मारताना दिसतात. रोज हजारो चाचण्या होत असल्यामुळे दुपारी दीड ते दोनच्या सुमारास स्थानक परिसरात प्रवाशांची भली मोठी रांग लागते. ती चुकविण्यासाठी काही प्रवासी प्रयत्न करताना दिसतात. या प्रवाशांना इशारेबाजी करीत हे रिक्षाचालक हळूच रांगेबाहेर काढून रिक्षात सुसाट दामटवतात. मनपाच्या सुरक्षारक्षकांचे पथकही या कारनाम्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे.
काहींना पकडले रंगेहाथ
रविवारी हा प्रकार उघडकीस येताच रिक्षा युनियनचे रवींद्र राऊत यांनी काही रिक्षाचालकांना रंगेहाथ पकडले होते. या वेळी स्थानक परिसरात मोठा हंगामा झाला होता. यामुळे आता कोविड चाचणी केंद्राजवळ सुरक्षेसाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.