रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा वाढली

By admin | Published: April 29, 2017 01:42 AM2017-04-29T01:42:50+5:302017-04-29T01:42:50+5:30

ओव्हरटेक करण्याच्या वादातून नवी मुंबई परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) बस चालक आणि वाहकाला रिक्षाचालकाने मारहाण केली आहे.

The rickshaw puller's mildness grew again | रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा वाढली

रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा वाढली

Next

कल्याण : ओव्हरटेक करण्याच्या वादातून नवी मुंबई परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) बस चालक आणि वाहकाला रिक्षाचालकाने मारहाण केली आहे. त्यात चालक, वाहकासह प्रवासी जखमी झाले आहेत. रिक्षाचालकाने बॅटने बसची काचही फोडली. मुजोरी आणि गुंडगिरी करणाऱ्या उमेश धावरे या रिक्षा चालकाला आणि त्याच्या साथीदाराला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण-शीळ रोडवर सूचकनाका येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. या घटनेमुळे गेल्या तीन महिन्यातील रिक्षाचालकांच्या मुजोरीची आणखी एक घटना समोर आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेची बस वाशीहून कल्याणच्या दिशेने येत होती. या बसच्या मागे असलेला रिक्षाचालक पत्र्यावर थाप देत होता. हा प्रकार तो साधारण एक किलोमीटरपासून करीत होता. त्याने या बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला होता. पण ओव्हरटेक करण्यास जागा मिळत नव्हती आणि बस प्रवासी भरत जात असल्याने तिची गतीही कमी होती. पण रिक्षाचालकाच्या त्रासाला कंटाळून बसचालकाने सूचकनाक्यावर बस थांबवली.
तेव्हा रिक्षा चालकाने गाडीसमोर रिक्षा आडवी घातली. रस्त्यालगत खेळत असलेल्या मुलाच्या हातातून बॅट हिसकावून घेतली आणि बॅटने त्याने बसच्या पुढील भागाची काच फोडली. तिचा चक्काचूर झाला. बसचे चालक विलास देसले आणि वाहक मयुर साबळे यांनाही रिक्षाचालकाने मारहाण केली. बसच्या फुटलेल्या काचा लागून बसमधून प्रवास करणारे चार प्रवासी जखमी झाले. (प्रतिनिधी)
पोलीस आणि रिक्षाचालकांत झटापट -
कल्याण : आग्रा रोडवरील लालचौकी येथे वाहतूक कोंडीला कारण ठरणारा रिक्षा स्टॅण्ड हटविण्याच्या मुद्द्यावरुन पोलीस आणि रिक्षा चालकांत शुक्रवारी झटापट झाली. बाजारपेठ पोलिसांनी दोन रिक्षाचालकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी अर्धा तास बंद पाळला.
वाहतूक पोलिसांनी लालचौकी येथील चुकीच्या दिशेने असलेला आणि वाहतुकीला अडथळा ठरणारा रिक्षा स्टॅण्ड हटविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी अधिसूचना काढली. स्टॅण्ड हटवून दुसऱ्या ठिकाणी सुरु करण्यास सांगितले होते. त्याला रिक्षाचालकांचा विरोध आहे. बाजारपेठ ठाण्यातील पोलीस कारवाईसाठी गेल्यावर त्याच्यात आणि रिक्षाचालकांत स्टॅण्ड हटविण्यावरुन झटापट झाली. रिक्षा चालकांनी स्टॅण्ड हटविला जाणार नाही, असा पावित्रा घेतला. यावेळी पोलिसांनी रिक्षाचालक रवींद्र वारे याच्यासह अन्य दोन रिक्षाचालकांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांना काही वेळेनंतर सोडून दिले आहे. आमच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा दावा वारे यांनी केला. लालचौकीचा स्टॅण्ड ४० वर्षापासून असल्याचा व त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत नसल्याचा त्यांचा दावा आहे. तेथे नव्याने सुरू झालेल्या कलाक्षेत्र नावाच्या दुकानाला स्टॅण्डचा अडथळा होत असल्याने पोलीस तो हटवत असल्याचा आरोप वारे यांनी केला.
भाजप रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुनील थळे यांनीही स्टॅण्ड हटविण्यास विरोध केला आणि दुकानदारावरच ठपका ठेवला. दुकानासमोर पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी त्याने वाहतूक पोलिसाच्या मदतीने स्टॅण्ड हटविण्याची अधिसूचना काढल्याचा त्यांचाही आरोप आहे.
लालचौकीचा स्टॅण्ड चुकीच्या दिशेने असल्याने तो हटविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दोन महिन्यापूर्वी अधिसूचना काढल्याचे ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले. कायमस्वरुपी रिक्षा स्टॅण्डसाठी जागा दिली आहे. ती काही रिक्षाचालकांना मान्य नसल्याचे ते म्हणाले.
वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही रिक्षा स्टॅण्ड हटविण्यासाठी गेलो होतो. त्याला रिक्षाचालकांनी विरोध केला. पोलिस व रिक्षा चालकांमध्ये झटापट झाली असली, तरी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The rickshaw puller's mildness grew again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.